कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने 1 मार्च पासून आवश्यकता भासल्यास काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा; वर्षा गायकवाड यांचे निर्देश
Varsha Gaikwad | (Photo Credits: Facebook)

राज्यातील काही जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार 1 मार्च 2021 पासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिले आहेत. विद्यार्थी व शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य आहे. ज्या शाळांमध्ये कोरोना प्रादुर्भाव आढळून आला आहे, तिथे आवश्यक स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास सूचना देण्यात आल्या असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. (वाचा - Coronavirus in Mumbai Update: मुंबईत आज सलग दुसऱ्या दिवशी आढळले 1 हजारांहून अधिक रुग्ण, नागरिकांनो करा नियमांचे पालन)

राज्यात काही जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांत कोरोनाचा प्रादुर्भाव आढळला. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी समाजकल्याण मंत्री आणि आदिवासी मंत्री, कल्याण विभाग यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेण्यात येत असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आज वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील देगाव येथील आदिवासी शाळेतील 4 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व वसतीगृहात राहणाऱ्या सुमारे 229 विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची धक्कादायक बाब आज समोर आली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.