
मुंबई मध्ये ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला वयोवृद्ध नागरिकांचे घरामध्येच व्हॅक्सिनेशन सुरू झाले. आणि बीएमसीच्या या उपक्रमाची बॉम्बे हाय कोर्टाने दखल घेत या लसीकरण मोहिमेमध्ये एकाही व्यक्तीला लसीकरणानंतर कोणताही दुष्परिणाम झालेला नाही ही बाब कौतुकाची असल्याचं सांगत डोअर टू डोअर लसीकरण मोहिमेचं कौतुक केले आहे.
बॉम्बे हाय कोर्टात मुख्य न्यायमूर्ती दिपाणकर दत्ता आणि जीएस कुलकर्णी यांनी बीएमसी वयोवृद्ध आणि अंथरूणाला खिळलेल्या नागरिकांच्या कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचं म्हटलं आहे. बीएमसी कडून इतर इतर महापालिकांनी, नगर पंचायतींनी देखील शिकावं असे देखील म्हटले आहे. नक्की वाचा: Door-To-Door Covid-19 Vaccination: मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचे घरोघरी जावून लसीकरण; BMC ने जारी केला ईमेल आयडी.
बीएमसी कडून मागील बुधवारी एक अॅफिडेव्हिट सादर करण्यात आले आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 4889 जणांचे रजिस्ट्रेशन झाले आहे त्यापैकी 1317 जणांना लसीचे डोस दिले आहेत. यामध्ये एकाला दुष्परिणामांचा त्रास झाला नसल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान मुंबई मध्ये बॉम्बे हाय कोर्टात धृती कपाडिया आणि कूणाल तिवारी यांनी एक याचिका सादर केली आहे. त्यांची केंद्राकडे 75 वर्षांवरील नागरिक, दिव्यांग आणि अंथरूणाला खिळलेल्यांना घरात लस मिळावी याची मागणी आहे. व्हिलचेअर वर असलेले किंवा वयोवृद्ध जे स्वतः लसीकरण केंद्रावर जाणं कठीण आहे. अशांसाठी काही सोय असावी. केंद्राकडून लस वाया जाणं आणि दुष्परिणामांच्या भीतीमुळे डोअर टू डोअर लस देण्याला अद्याप परवानगी नाही.
महाराष्ट्रात बीएमसीने मात्र एका प्रायोगिक तत्त्वावर लसीकरण घरात जाऊन देण्याला सुरूवात केली आहे. कपाडियांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार मुंबई पाठोपाठ ठाणे आणि मीरा भाईंदर महापालिकेने देखील हा उपक्रम सुरू केला आहे. आता बॉम्बे हाय कोर्टात या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 सप्टेंबरला होणार आहे.