Door-To-Door Covid-19 Vaccination: मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचे घरोघरी जावून लसीकरण; BMC ने जारी केला ईमेल आयडी
File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा (Coronavirus Third Wave) धोका टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मुंबई पालिका प्रशासन (BMC) सज्ज झालं आहे. मागील महिन्यापासून घरोघरी जावून लसीकरण करणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. त्यानुसार आता अंथरुणास खिळलेल्या व्यक्तींना (Bedridden People) घरी जावून लसी दिली जाणार आहे. राज्यातील सर्व नागरिकांना लस मिळावी, यासाठी आजारपण, वयोमान किंवा इतर कारणांनी अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांना घरोघरी जावून लस देण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने ई-मेल आयडी (email-id) जारी केला आहे.

covidvacc2bedridden@gmail.com असा हा या ईमेल आयडी असून यावर लसीकरण करण्यात येणाऱ्या नागरिकांची संपूर्ण माहिती पाठवावी, असं आवाहन पालिकेने केलं आहे. यात नाव, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणास खिळून राहण्याचे कारण इत्यादी माहिती असावी. त्यामुळे अशा व्यक्तींचे लसीकरण करणे सोयीचे होईल, असं पालिकेने म्हटलं आहे. (Door-To-Door Vaccination in Maharashtra: राज्यात लवकरच घरोघरी लसीकरणाला सुरुवात; ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय)

यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन लसीकरण, दिव्यांग व्यक्तींसाठी घराजवळच्या लसीकरण केंद्रावर लसींची सोय यांसारखे उपक्रम पालिकेकडून राबवण्यात आले आहेत. त्यामुळे लसीकरणाला प्रोत्साहन आणि गती मिळाली. दोन दिवसांपूर्वी मुंबईत गर्भवती महिलांच्या लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. शहरातील 35 केंद्रांवर हे लसीकरण सुरु आहे.

दरम्यान, परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या अनुभवावरुन घरोघरी लसीकरण मोहिम राबवण्यात येईल. तसंच जिल्ह्याच्या मध्यम आकारामुळे पुण्यापासून राज्यातील घरोघरी लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करणार असल्याचेही राज्य सरकारने सांगितलं होतं.