ज्येष्ठ नागरिक (Senior Citizens) आणि दिव्यांग (Disabled) व्यक्तींसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोविड-19 लसीचा (Covid-19 Vaccine) अद्याप एकही डोस न घेतलेल्या किंवा पहिला डोस घेतलेल्या ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांना त्यांच्या घराजवळील लसीकरण केंद्रात (NHCVC) लस मिळणार आहे. लसीकरण केंद्रावर जावून लस घेण्यासाठी ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा, हा या निर्णयामागील उद्देश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या घराजवळच्या लसीकरण केंद्रात लस मिळावी यासंदर्भातील प्रस्ताव तांत्रिक तज्ञ समितीने सादर केला होता. हा प्रस्तावाची National Expert Group ने शिफारस केल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने या शिफारसीला मंजुरी देत काही अटी लागू केल्या आहेत. दरम्यान, या विशेष लसीकरण केंद्रांसाठी शाळेच्या इमारती, वृद्धाश्रम, पंचायत कार्यालये यांसारख्या इमारतींचा वापर करावा, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. (Sputnik-V लस जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून होणार उपलब्ध, Apollo रुग्णालयात नागरिकांचे होणार लसीकरण)
घराजवळील लसीकरण केंद्रावर कोणाला मिळणार लस?
# 60 वर्षांवरील लसीचा एकही डोस न घेतलेले नागरिक.
# लसीचा पहिला डोस घेतलेले 60 वर्षांवरील नागरिक.
# 60 वर्षांखालील दिव्यांग व्यक्ती.
NHCVC साठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लागू करण्यात आलेले नियम:
# कोविन अॅप किंवा संबंधित अॅपच्या माध्यमातून लसीकरणासाठी प्री-रजिस्ट्रेशन करता येईल.
# लाभार्थ्यांची यादी जाहीर करावी.
# NHCVC ची लसीकरण केंद्र ही इतर केंद्रांपेक्षा वेगळी असावी.
# NHCVC साठी व्यवस्थित नियोजन करण्यात यावे.
# लस घेणाऱ्या ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींना केंद्रापर्यंत येण्यास वाहतुकीची सोय असावी.
# ज्येष्ठ किंवा दिव्यांग व्यक्तींसोबत खेळीमेळीच्या वातावरणात लसीकरण केले जावे.
या विशेष लसीकरण केंद्रांमध्ये एक लसीकरण विभाग आणि मोठा वेटिंग एरिया असावा. यासोबतच लस घेतल्यानंतर 30 मिनिटांपर्यंत नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यासाठी निरिक्षण कक्ष असावे, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.