नाशिक मधील वणी येथील सप्तश्रृंगी गडावरील बोकड बळीची प्रथा पुन्हा सुरू झाली आहे. उच्च न्यायालयाने ही प्रथा पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे यंदा दसर्याला 5 वर्षांनी बोकड बळी प्रथा सुरू होणार आहे. यासाठी आदिवासी विकास सोसायटी कडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी दरम्यान कोर्टाने आज परवानगी दिली आहे.
सप्तशृंगी गडावर महिषासुराच्या रुपात बोकडाचा बळी देण्याची प्रथा आहे. 2016 साली मंदिर परिसरामध्ये बोकड बळी देताना बंदुकीच्या छर्यांनी 12 जण जखमी झाले होते. या प्रकारानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ही प्रथा बंद झाली होती. पण आता 5 वर्षांनी त्याला पुन्हा परवानगी दिली जात आहे.
सध्या नवरात्र सुरू आहे. आदिशक्तीचा जागर करताना राज्यात सगळीकडेच मोठ्या प्रमाणात देवीच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतात. पण यामधून अनुचित प्रकार टाळण्यासाठी उच्च न्यायालयाने अटी-शर्थीसह बोकड बळी प्रथा पुन्हा सुरु करण्यात परवानगी दिली आहे. नवस पूर्ण करताना देखील अनेकजण येतात. नक्की वाचा: कोल्हापूरची अंबाबाई , माहूरची रेणुकादेवी, सप्तशृंगी आणि तुळजापूरची तुळजाभवानी; महाराष्ट्रातील या साडेतीन शक्तिपीठांचा इतिहास आहे खास, जाणून घ्या.
महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तशृंगीदेवी नाशिकपासून 65 किमीवरील 4800 फूट उंचावरील सप्तशृंगगडावर वसलेली आहे. नवरात्री दरम्यान सप्तश्रृंगी देवीवर अभिषेक करण्यास यंदा मनाई करण्यात आली आहे. त्याऐवजी भाविकांच्या देणगीतून घडविण्यात आलेल्या 25 किलो चांदीच्या मूर्तीवर आता अभिषेक केला जाईल अशी माहिती देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.