Navneet Rana |

Navneet Rana Booked In Telangana: अमरावती लोकसभा खासदार आणि भाजपच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी दिलेली वक्तव्ये आता त्यांच्यासाठी घातक ठरत आहेत. काही काळापूर्वी त्यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यात आणि ओवेसी यांच्यात जोरदार वाद सुरू होता, आता काँग्रेसविरोधात केलेल्या विधानामुळे राणा अडचणीत आल्या आहेत. नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा यांनी राहुल गांधींच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर हैदराबादच्या शादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप नेत्याविरुद्ध निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. बुधवारी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, निवडणूक कर्तव्यावर तैनात निवडणूक आयोगाचे एफएसटी कृष्ण मोहन यांनी नवनीत राणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. भादंवि कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहवालानुसार, नुकतेच भाजप खासदार नवनीत राणा या महबूबनगर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डीके अरुणा यांच्या प्रचारासाठी शादनगरमध्ये आल्या होत्या, यावेळी त्यांनी काँग्रेसविरोधात वक्तव्य केले होते. ‘काँग्रेसला मतदान करणे म्हणजे पाकिस्तानला मतदान करणे’, असे त्यांनी म्हटले होते. त्या पुढे म्हणाल्या की, ‘पाकिस्तान ज्या प्रकारचे एआयएमआयएम (AIMIM) प्रेम आणि राहुलप्रेम दाखवत आहे, त्यावरून त्यांना राहुल यांची जिंकावे आणि मोदींनी हरावे असे वाटते हे स्पष्ट होते. काँग्रेस सरकार पाकिस्तानच्या इशाऱ्यावर देशाचे सरकार चालवत आले आहे. त्यामुळेच आता पाकिस्तान त्यांना आपले प्रेम दाखवत आहे.’ (हेही वाचा: War of Words Between Navneet Rana and Asaduddin Owaisi: '15 सेकेंद द्या', 'एक तास घ्या'; नवनीत राणा आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यात 'वाकयुद्ध'; माधवी लता यांच्याकडून स्पष्टीकरण)

याआधी ओवेसी बंधूंवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या होत्या, ‘तुम्ही 15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवले, तर 'कहां से आया और कहां गया' हे समजू शकणार नाही... आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील फक्त 15 सेकंद..’. त्या ओवेसींच्या विधानाला प्रत्युत्तर देत होत्या, ज्यात कबरुद्दीन औवैसी यांनी 'फक्त 15 मिनीटे पोलीस संरक्षण हटवा, तुम्हाला मुस्लीमांची ताकद दाखवून देतो', अशा आशयाचे वादग्रस्त विधान हिंदू समूहाला उद्देशून केले होते.