नवी मुंबईतील (Navi Mumbai) वाशी (Vashi) येथे शनिवारी (30 ऑक्टोबर) पहाटे एकाच कुटुंबातील तिघांनी विष पिऊन आत्महत्या (Sucide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, मोहिनी कमवानी (87), दिलीप कमवानी (67), कांता कामवानी (55) अशी मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. (हे ही वाचा: Thane: जीम मालकाच्या छळाला कंटाळून कंत्राटदाराची गळफास लावून आत्महत्या)
शनिवारी सकाळी 7.30 च्या सुमारास दिलीप कमवानी यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला. त्यांनी त्यांच्या आई आणि बहिणीसह आर्थिक समस्यांमुळे विष प्राशन केले असल्याची माहिती पोलिसांना फोनवरून दिली. नियंत्रण कक्षाने वाशी पोलिस स्टेशनला कळवताच पोलिस त्यांच्या घरी पोहोचले आणि तातडीने तिघांना उपचारासाठी NMMC रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांनी दिली.
दिलीप कामवानी शुद्धीवर असताना आम्ही त्यांचे स्टेटमेंट नोंदवले. या तिघांनी उंदीर मारण्याचे विष, बेगॉन रसायन आणि काही गोळ्यांचे सेवन केले होते. आर्थिक संकटामुळे नैराश्यात असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले. याप्रकरणी आम्ही तीन वेगवेगळ्या अपघाती मृत्यूची नोंद केली आहे, असे पोलीसांनी सांगितले.
वाशी पोलिसांनी शनिवारी सकाळी तिन्ही रुग्णांना आपत्कालीन कक्षात आणले होते. त्यांनी विषारी रसायनाचे मिश्रण प्राशन केल्याचे दिसते, ज्याचे रासायनिक विश्लेषणाने अद्याप निश्चित झालेले नाही असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे म्हणाले
दरम्यान, कामवानी कुटुंबाचा त्यांच्या काही नातेवाईकांशी दीर्घकाळ आर्थिक वाद होता आणि त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये काही तक्रारी देखील नोंदवल्या होत्या. 'आमच्या मुद्द्यांवर न्याय न मिळाल्यास आत्महत्या करु ,' असे पत्र त्यांनी 2012 मध्ये भारताचे राष्ट्रपती आणि इतर राज्य आणि केंद्रीय कार्यालयांना लिहिले होते. मोहिनी कमवानी आणि त्यांचा मुलगा दिलीप यांनी यापूर्वी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर त्यांच्या न्याय मागण्यांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांशी आर्थिक वाद सोडवण्यासाठी उपोषण केले होते.