सोमवारी पनवेलमधील दापोली गावाजवळील नवी मुंबई विमानतळाच्या (Navi Mumbai Airport) ठिकाणी 27 गावांतील 10,000 हून अधिक ग्रामस्थांनी कडेकोट पोलीस बंदोबस्तात लाक्षणिक काम बंद आंदोलन केले. सध्या सुरू असलेली विमानतळाची कामे पूर्णपणे ठप्प राहिल्याने हे आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा सर्वपक्षीय कृती समितीच्या (APAC) प्रतिनिधींनी केला. एपीएसी प्रतिनिधींनी त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे, अन्यथा ते पुन्हा आंदोलन सुरू करतील ज्यामध्ये एक लाखाहून अधिक ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील, असे सांगण्यात आले.
कृती समितीच्या लोकांनी 27 गावांच्या समस्यांसाठी 24 जानेवारीला काम बंद आंदोलन करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. यासाठी त्यांनी पोलिसांकडे परवानगीही मागितली होती, मात्र पोलिसांनी त्यांना आंदोलनाची परवानगी दिली नाही. असे असतानाही 27 गाव समित्यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवर काम बंद आंदोलन सुरू केले. नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी आंदोलकांना घरी जाण्याचे आवाहन करत, जर तुम्ही तसे न केल्यास व आंदोलन चालूच ठेवले तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले.
राज्यातील वाढत्या कोविड प्रकरणांमुळे पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली होती. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीचे काम सुरू असून, त्यासाठी या 27 गावांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत. सिडको ही नोडल एजन्सी आहे. जागा खरेदी करताना त्यांनी अनेक आश्वासने दिली होती, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आम्हाला नोकऱ्या आणि पुनर्वसन घरे देण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र सिडकोने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळेच आज आम्ही आमच्या मागण्यांसाठी येथे आंदोलन करत आहोत. सिडकोने आमच्या मागण्या मान्य केल्यास आम्ही आंदोलन संपवून घरी जाऊ, असे आंदोलकांनी सांगितले.
मोठ्या संख्येने जमलेल्या ग्रामस्थांच्या जमावाकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 1,200 हून अधिक पोलीस कर्मचारी आंदोलनस्थळी तैनात करण्यात आले होते. यासह 100 पोलीस उपनिरीक्षक, 30 वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस कर्मचारी देखील नियुक्त केले होते. (हेही वाचा: BMC Instructions: बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुख्य विद्युत निरीक्षकांना दिले इमारतींचे इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याचे निर्देश)
यासह, नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून राज्यात सध्या मतभेद आहेत. राज्य सरकारने शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे ठरवले आहे. मात्र नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त व स्थानिकांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत गेल्या आठवड्यात शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) आणि एपीएसी यांच्यात चर्चा झाली मात्र ती अयशस्वी ठरली.