कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथीच्या काळात घरी अभ्यास करताना 45 टक्के विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करणे आनंददायी ठरले, तर 38 टक्के विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करणे कठीण झाले होते. त्याच वेळी, 24 टक्के विद्यार्थ्यांकडे महामारीच्या काळात घरी कोणतेही डिजिटल उपकरण उपलब्ध नव्हते. शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षण अहवाल 2021 (NAS 2021) मध्ये हे उघड झाले आहे. सर्वेक्षणात 50 टक्के विद्यार्थ्यांना शाळेतून अभ्यास आणि घरातून अभ्यास यात काहीच फरक जाणवला नाही. या काळात 78 टक्के विद्यार्थ्यांसाठी भरपूर असाइनमेंट मिळणे हे एक ओझे बनले होते.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षण 2021 आयोजित केले होते. इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे वाचन आणि शिकणे यासह शालेय शिक्षण प्रणालीच्या स्थितीचे मूल्यांकन करणे हा त्याचा उद्देश होता. या सर्वेक्षणात ग्रामीण आणि शहरी भागातील 1.18 लाख शाळांमधील 34 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे रिपोर्टनुसार, राष्ट्रीय स्तरावर 7 टक्के शाळांमधील शिक्षक गैरहजर होते. तर 17 टक्के शाळांमध्ये वर्गात पुरेशी जागा नसल्याचे समोर आले आहे. सुमारे 80 टक्के विद्यार्थ्यांना वाटते की ते त्यांच्या शिक्षकांच्या मदतीने ते घरापेक्षा शाळेत चांगल्या गोष्टी शिकू शकतात. भारतातील सुमारे 48 टक्के विद्यार्थी अजूनही पायीच शाळेत जातात. भाषा, गणित, पर्यावरणशास्त्र, सामाजिक विज्ञान आणि इंग्रजी अशा विविध विषयांवर हे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये दिसून आले की, विद्यार्थी जस जसे पुढच्या वर्गात जात आहेत, तास तसे त्यांची शिकण्याची क्षमता कमी होत आहे.
महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर, महाराष्ट्रातील 7,226 शाळा, 30,566 शिक्षक आणि 2,16,117 लाख विद्यार्थ्यांचा सहभाग होता. सर्व वयोगटांमध्ये, महाराष्ट्राची एकूण राज्य कामगिरी भाषा, गणित आणि पर्यावरण अभ्यास विषयांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगली होती. नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेच्या निकालात मुंबई उपनगरी भागातील हायस्कूल मुलांचा शिकण्याचा परिणाम महाराष्ट्रात सर्वात वाईट ठरला आहे. प्राथमिक शाळेतील मुलांचा विचार केला तरी, मुंबईची कामगिरी दुर्गम अशा गडचिरोलीपेक्षा किंचित चांगली आहे.
सर्वेक्षणात दिसून आले आहे की, महाराष्ट्रातील हायस्कूलमधील तीनपैकी एक विद्यार्थी विज्ञान आणि गणिताच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरेही देऊ शकत नाही. विद्यार्थी उच्च वर्गात गेल्यानंतर त्यांची कामगिरी खराब होत असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रातील सर्वेक्षण केलेल्या 36 जिल्ह्यांपैकी, मुंबई उपनगरात सर्वात वाईट कामगिरी होती जिथे केवळ 28.8 टक्के दहावी आणि 34.4 टक्के इयत्ता आठवी विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. तुलनेने, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या लहान जिल्ह्यांमध्ये काही चांगले शिक्षण परिणाम मिळाले.
इयत्ता तिसरी (64.2), इयत्ता पाचवी (57.2), आठवी (44.7) आणि दहावी (42.7) यांसारख्या बहुतांश वयोगटांमध्ये पुणे जिल्ह्याची कामगिरी राज्याच्या सरासरीपेक्षा चांगली होती. (हेही वाचा: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; 1 जून 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन)
राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षण 2021 अंतर्गत राज्यवार कामगिरी देखील सादर केली जाते, जिथे बहुतेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची कामगिरी एकूण राष्ट्रीय स्कोअरपेक्षा खूपच कमी असल्याचे दिसून आले. पंजाब, केरळ, राजस्थान, महाराष्ट्र आणि चंदीगड या प्रदेशांनी राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगले गुण मिळवले आहेत. दादरा आणि नगर हवेली सारखे केंद्रशासित प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश आणि तेलंगणा सारखी राज्ये या सर्वेक्षणात सर्वात कमी कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत समाविष्ट आहेत.
दरम्यान, कोविड महामारीमुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या होत्या आणि त्यामुळे विविध स्तरावर शिक्षण विस्कळीत झाले होते. शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय परिणाम झाला याचे मूल्यांकन करण्यासाठी, लॉकडाऊनच्या आधी आणि नंतर राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षणाद्वारे शिक्षण व्यवस्थेचे मूल्यांकन केले गेले.