भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde) यांनी पक्षांतर्गत विरोधकांवर नामोल्लेख टाळत जोरदार टीकास्त्र सोडले आहे. इतकेच नव्हे तर माझे नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शाह (Amit Shah,) आणि पक्षाध्य जे पी नड्डा (JP Nadda) हे आहेत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रकांत पाटील यांसारख्या महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांचा नामोल्लेखही टाळला. पंकजा मुंडे यांनी दिल्ली येथे जाऊन नुकती केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतली. त्यानंतर महाराष्ट्रात परतलेल्या पंकजा मुंबई येथे प्रसारमाध्यमांसमोर बोलत होत्या. या वेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अधार देत संयम राखण्सा सांगितले. नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या विस्तारात खासदार प्रितम मुंडे यांची वर्णी लागेल अशी चर्चा होती. प्रत्यक्षात मात्र प्रितम मुंडे यांची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागलीच नाही. उलट कालपरवा पक्षात आलेल्या अगदी नव्या आणि बाहेरच्या चेहऱ्यांना संधी मिळाली त्यावरुन भाजपतील मुंडे गटात अस्वस्थता होती.
पंकजा मुंडे यांनी बोलताना सांगितले की, मी कुणाला भीत नाही. पण सर्वांचा आदर करते. माझ्यावर स्वर्गिय गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार आहेत. मी निर्भय आहे. माझी निर्भयता माझे कार्यकर्ते आणि जनतेच्या जोरावर आहे. मी वयाने माझ्यापेक्षा मोठे असलेल्या व्यक्तीचा कधीही अनादर केला नाही. माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की धर्मयुद्ध टळावं. धर्मयुद्ध टळावं अशीच माझी आजही इच्छा आहे. त्यासाठीच आपण इथे उभा असल्याचे सांगत बीड, परळी येथील पदाधीकाऱ्यांनी दिलेले राजीनामे नामंजूर करत असल्याचेही पंकजा मुंडे यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, Union Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीच्या वृत्तांवर पंकजा मुंडे यांच्याकडून पूर्णविराम)
पंकजा मुंडे यांनी नामोल्लेख टाळला असला तरी त्यांच्या बोलण्याचा रोख हा महाराष्ट्र भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर असल्याचे स्पष्ट जणवत होते. भाजपमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर त्यांनी आज पंकजा मुंडे यांची भेट घेतली. या वेळी व्यक्त केलेल्या मनोगतात पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.
माझा माझ्या नेत्यांवर विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जे पी नड्डा हे राष्ट्रीय पातळीवरील नेते हेच माझे नेते आहेत. त्यामुळे ते माझ्याबाबत योग्य निर्णय घेतील. मी कष्टाला घाबरणारी व्यक्ती नाही. मला माझ्यासाठी म्हणून काही नको. मला जे हवे आहे ते माझे कार्यकर्ते आणि जनतेसाठी हवे आहे. गरज पडल्यास कोयता घेऊन कामाला जाऊ. पण मी माझ्यासाठी काही मागणार नाही. तुम्ही माझ्या पेक्षा वयाने मोठे आहात. तुम्हीच का ते समजून घ्या. प्रोटोकॉलने तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. त्यामुळे मला समजून सांगायचा प्रयत्न करु नका. तुम्ही काय तो योग्य निर्णय घ्या, असेही पंकजा मुंडे या वेळी म्हणाल्या.
पंकजा मुंडे फेसबुक लाईव्ह
आपल्या जीवनातील स्पीरीट कायम ठेवा. जेव्हा असे वाटेल की इथे आता काही राम नाही. तेव्हा तेव्हाचे तेव्हा पाहू. भागवत कराड यांना मंत्री बनवले आहे. मला त्याचे वाईट वाटत नाही. उसाच्या फडात काम करणाऱ्या मानसाला संधी मिळाली. ही मोठी गोष्ट आहे. मला माझ्यासाठी, प्रितमसाठी काहीच नको आहे. त्यामुळे मी न बोलताही तुम्हाला माझ्याबद्दल कळतं. पण तुमच्याराजीनाम्यावर मी स्वार होणार नाही. आपण आपलं घर सोडायचं नाही. ज्या दिवशी इथे राम नाही हे कळेल त्या दिवशीचे त्या दिवशी बघू असेही पंकजा मुंडे या वेळी म्हणाल्या.