केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर मुंडे भगीणी नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. प्रसारमाध्यमांतूनही त्याबाबत वृत्त आले. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी स्वत:च पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आणि आपण नाराज नसल्याचे सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे यांनी मौन बाळगले होते. नेहमी ट्विटरवर व्यक्त होणाऱ्या पंकजा मुंडे अथवा प्रितम मुंडे यांनी नव्या मंत्र्यांचे अभिनंदन अथवा त्यांना शुभेच्छाही दिल्या नव्हत्या. त्यावरुन त्या नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर आपण नाराज नाही. ट्विटरवरुन अभिनंदन करावे असे मला वाटले नाही. ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्याशी माझे फोनवरुन प्रत्यक्ष बोलने झाले, असे सांगत नाराजीवृत्तास मुंडे यांनी पूर्णविराम दिला.
पंकजा मुंडे म्हणाल्या प्रसारमाध्यमांतून आमच्या नावाची नेहमीच चर्चा असते. त्यातच प्रीतम मुंडे या दिल्लीला गेल्याचे वृत्त आलं. प्रत्यक्षात प्रीतम मुंडे मुंबईतच होत्या. प्रसारमाध्यमांनी चुकीचे वृत्त दिले. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी आपण दिल्लीला निघालो असल्याचे स्क्रिनशॉट पाठवले. त्यामुळे उगाचच गैरसमज होऊ नयेत. म्हणून मी प्रीतम मुंडे मुंबईत असल्याची माहिती दिली. मात्र, वस्तुस्थिती विचारात न घेता मी नाराज असल्याचा तर्क बांधून वृत्त देण्यात आले. मी इतकेच सांगू इच्छिते की संधी कोणाला संधी मिळाली तर आनंद वाटनं स्वाभाविक आहे. आमच्यावर मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. त्यामुळे नाराज असण्याचे काहीच कारण नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटले. (हेही वाचा, Shiv Sena On Modi Cabinet Reshuffle: केंद्रीय मंत्रीमंडळातील बरेचसे सदस्य लाटेबरोबर वाहून आलेले ओंडके: शिवसेना)
भागवत कराड यांचा मला फोन आला होता. भारती पवार, कपिल पाटील यांच्याशी माझे बोलणे झाले होते. त्यांना आगोदरच्या दिवशी मेसेज मिळाला होता. त्यामुळे ते दिल्लीत होते. प्रितम मुंडे यांना मेसेज मिळाला नव्हता. त्यामुळे त्या मुंबईतच होत्या. याबातब मी ट्विट केले तर काही महान लोकांनी अर्थ लावला की पंकजा मुंडे यांनी ट्विट केले त्यामुळे प्रीतम मुंडे यांचे मंत्रीपद गेले. पण हे सगळंच मला हस्यास्पद वाटतं, अशी प्रतिक्रियाही पंकजा मुंडे यांनी दिली आहे.