राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची वाढणारी मोठी संख्या आणि आरोग्य सुविधांचा तुटवडा यामुळे नकारात्मक चित्र निर्माण होत आहे. यात नांदेड (Nanded) मधून एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर येत आहे. कोविड-19 (Covid-19) संसर्गामुळे पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच पत्नीने 3 वर्षांच्या मुलासह आत्महत्या केली. नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात ही घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (हैदराबाद: कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने पत्नीने इमारतीहून उडी मारून केली आत्महत्या; 20 तास पडून राहिला मृतदेह)
शंकर गंदम असे मृत व्यक्तीचे नाव असून ते मूळचे आंध्रप्रदेशातील आहे. व्यवसायानिमित्त ते लोहा शहरातील बालाजी मंदिर परिसरात आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये होती. दरम्यान, शंकर यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
शंकर यांच्या मृत्यूची बातमी समजताच पत्नी पद्मा गंदम यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी तीन वर्षांच्या मुलासोबत लोहा परिसरातील तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. मात्र गंदम दांपत्यांच्या मृत्यूमुळे दोन्ही मुली अनाथ झाल्या आहेत.
दरम्यान, राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दिवसागणित कोरोना रुग्णसंख्येत मोठी भर पडत आहे. कालच्या अपडेटनुसार, राज्यात 58,952 रुग्णांची नोंद झाली असून 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना संसर्गात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर कोरोनाच्या भीतीमुळे आत्महत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.