
काँग्रेस हायकमांडने (Congress High Command ) महाराष्ट्र काँग्रेस नेतृत्वामध्ये मोठे फेरबदल करत प्रदेशाध्यक्ष पदाची (Maharashtra Congress State President) धुरा नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे सोपवली. मग नाना पटोले (Nana Patole Maharashtra Congress State President) यांच्या निवडीने काँग्रेसला प्रदीर्घ काळानंतर एक खमक्या प्रदेशाध्यक्ष मिळाला अशी चर्चा राजकीय वर्तुळात लागलीच सुरु झाली. नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी निवड करणे ही खरे तर काँग्रेसची गरजच होती. दुसऱ्या बाजूला या निवडीच्या माध्यमातून काँग्रेस नेतृत्वाने एक सांगावाही दिला आहे. अर्थात राजकारणात उघड काहीच नसते. असते ते सगळे सूचकच. त्यामुळे या सांगाव्याकडेही तसेच पाहायला हवे.
काँग्रेसची गरज आणि पटोले यांचा अश्वासक चेहरा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर आजवर जे चेहरे होते त्यातील बहुतांश चेहरे मवाळ होते. मग ते माणिकराव ठाकरे असोत, अशोक चव्हाण असोत अथवा मावळते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात असो. हे सर्वच चेहरे मवाळ म्हणून ओळखले जातात. तुलनेत नाना पटोले हे आक्रमक आणि स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. त्यांना निवडणुका लढविण्याचा आणि जिंकण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. अपवाद वगळता ते निवडणूक पराभूत झाले नाहीत. दुसऱ्या बाजूला त्यांना संघटनात्मक राजकारणाचाही चांगला अनुभव आहे. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेस पक्षाला उर्जा देण्यासाठी आक्रमक आणि तितकाच विश्वासार्ह चेहरा हवा होता. नाना पटोले यांच्या रुपात तो मिळाला. असा चेहरा मिळणे ही काँग्रेसची गरज होती. अर्थात पटोले यांचे पक्षांतर्गत विरोधक किंवा टीकाकार असेही म्हणू शकतील की मध्यंतरी त्यांनी काँग्रेस सोडली होती त्याचे काय? या प्रश्नाचे उत्तर हाच तर काँग्रेस नेतृत्वाने दिलेला सांगावा आहे. (हेही वाचा, स्थानिक निवडणूकींंसाठी कॉंग्रेस सज्ज, Nana Patole यांच्याकडे महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोबतच 'या' दिग्गज नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी)

पुन्हा काँग्रेस
नाना पटोले हे तसे मुळचे काँग्रेसचे. परंतू, लोकसभा निवडणूक 2014 पूर्वी काही कारणांनी ते भारतीय जनता पक्षात सहभागी झाले. निवडूण आले. खासदार झाले. केंद्रात मंत्रीपद मिळेल अशी साधारण त्यांना आशा होती. परंतू, केंद्रातील मंत्रिपदाने त्यांना हुलकावणी दिली. पटोले यांनी उघड काहीच बोलून दाखवले नाही. परंतू, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी पंगा घेतला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सर्वोच्च स्थानावर असताना पटोले यांनी भाजप खासदारकीचा राजीनामा दिला आणि पुन्हा ते काँग्रेसमध्ये आले.

दुसरी इनिंग जोरदार सुरु
काँग्रेस पक्षाचे गुजरात प्रभारी राजीव सातव यांच्या पुढाकाराने गुजरात येथील एका जाहीर सभेत नाना पटोले यांचा काँग्रेस प्रवेश झाला. या प्रवेशानंतर नाना पटोले यांची काँग्रेसमधील राजकीय इनिंग जोरदार सुरु झाली. त्याची सुरुवात सुरुवातीला काँग्रेस पक्षाकडून विधानसभा तिकीट मिळणे आणि त्यानंतर महाविकासआघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष होणे याने झाली. आता तर ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाले आहेत.

काँग्रेस नेतृत्वाकडून सांगावा
नाना पटोले यांना काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपद देऊन नेतृत्वाने एक सांगावाच दिला आहे. भारतीय जनता पक्षाला 2014 नंतर जे यश मिळाले आहे ते यश केवळ भाजपचे नाही. त्यातही ते पूर्णपणे निर्भेळ यश म्हणता येणार नाही. कारण भाजपने मोठ्या प्रमाणावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांतून फोटाफोडी करुन नेते आयात केले. त्याचा परीणाम विजयात झाला. नाना पटोले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि बाणेदारपणा दाखवत राजीनामा देऊन पुन्हा काँग्रेस प्रवेश केला. काँग्रेस नेतृत्वाने हीच गोष्ट अधोरेखीत केली आहे. जे काँग्रेस विचारांवर निष्ठा ठेवतात त्यांना अनेक गुन्हे (राजकीय) माफ केले जाऊ शकतात हा सांगावा आहे.

नाना पटोले ही सरुवात आहे. आगामी काळात असे अनेक काँग्रेस प्रवेश झाल्यास आणि काँग्रेस नेतृत्वाने त्याचा स्वीकार केल्यास नवल वाटायला नको. काँग्रेसवर निष्ठा ठेऊन वाटचाल करणाऱ्या अनेकांसाठी यापुढे पक्षात अच्छे दिन दिसू शकतात. कामगिरी चांगली झाल्यास आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनही दिसू शकतात. अर्थात, याबाबत येणारा काळच नेमके काही सांगू शकेल.