Nail Disorders And Baldness | Edited Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Pixabay)

Nail Virus: बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात नेमके चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित व्हावा अशी स्थिती आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील शेगाव (Shegaon) तालुक्यात अचानक उद्भवलेल्या केसगळती (Hair Loss) विकाराने नागरिक त्रस्त झाले होते. त्यानंतर प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेची झालेली पळापळ आणि उपाययोजना, अहवाल अद्यापही कायम आहेत. त्यातच आता याच भागात नखांचे विकार (Nail Disorders) बळावत आहेत. तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांना नखं गळण्याचा आणि त्याच्याशी संबंधिक विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. तर नागरिक हवालदिल झाले आहेत.

टक्कल व्हायरस नंतर नखांशी संबंधीत समस्या

बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या शेगाव तालुक्यातील सुमारे 15 गावे अशी आहेत, जी केस विकारांनंतर आता नख विकार आणि तत्सम समस्यांचा सामना करत आहेत. ज्यामुळे नागरिकांमध्ये भीताचे वातावरण तर आहेच. पण, विशिष्ट प्रदेशामध्येच असे काहीसे विचीत्र विकार का उद्भवत आहेत? याबाबत चिंताही व्यक्त केली जात आहे. पाठिमागील तीन महिन्यांमध्ये या भागातील नागरिकांमध्ये अंगावरील केस गळण्याची समस्या निर्माण झाली होती. खास करुन डोक्याला टक्कल पडणे अधिक वाढले होते. गावातील जवळपास बहुतांश नागरिक टक्कल व्हायरस ग्रस्त झाले होते. अर्थात आता त्यांच्या टकलांवर केस येऊ लागले आहेत. (हेही वाचा, Buldhana Vision impairment: केस गळणे, टक्कल पडणे यातून सावरताच दृष्टीदोष उद्भवला; बुलढाणा जिल्ह्यात नागरिकांपुढे आरोग्य समस्या)

बोंडगाव येथील नागरिकांमध्ये अधिक समस्या

शेगाव तालुक्यातील बोंडगाव येथील नागरिकांमध्ये बोटांची नखं गळण्याच्या समस्या पाहायला मिळत आहेत. केवळ बोंडगावचेच नागरिक नव्हे तर परिसरातील इतर गावांमध्येही तशीच परिस्थिती आहे. गावात केसगळतीची समस्या उद्भवल्यानंतर जिल्हा आरोग्य प्रशासन, आयसीएमआर तज्ज्ञ यांद्वारे पाहणी करण्यात आली. या तज्ज्ञांनी काही निरीक्षणे नोंदवली पण अद्यापही आयसीएमआरचा अहवाल आला नाही. त्यामुळे केसांची समस्या नेमकी कशामुळे उद्भवली याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. अर्थात नाही म्हणायला पाण्यात नायट्रेटचे प्रमाण जास्त (54%) असल्याने केसगळती झाल्याचे सांगितले गेले. पण, अहवाल आला नसल्याने अधिक तपशील उपलब्ध नाही.  (हेही वाचा, Does Hair Loss or Baldness Affects Self-Esteem: केस गळणे किंवा टक्कल पडल्याने आत्मविश्वासावर खरंच परिणाम होतो? घ्या जाणून)

परिसरात 70% टक्कलग्रस्त

तालुक्यातील केसगळतीने ग्रासलेल्या नागरिकांमध्ये जवळपास 70% नागरिकांचा समावेश आहे. या गावातील समस्येशी संबंधीत काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:

  • परिसरातील 70% नागरिक टक्कलग्रस्त
  • टक्कलग्रस्तांमध्ये महिला, लहानमुले आणि तरुणांचाही समावेश
  • बोंडगाव आणि खातखेड गावात सर्वाधिक समस्या
  • पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक (54%) असल्याने समस्या उद्भवल्याचे निदान
  • पाण्यात नायट्रेटचे प्रमाण 10% योग्य

दरम्यान, टक्कलग्रस्त नागरिक असलेल्या परिसरात केवळ पाण्यात नायट्रेटचे प्रमाणच अधिक आहे असे नव्हे. या परिसरातील पाण्यात चक्क क्षारांचे प्रमाणही अधिक आहे. पाण्यात क्षारांचे प्रमाण 110 इतके असणे सामन्य आहे. पण, या परिसरातील पाण्यात हेच प्रमाण तब्बल 2100 इतके आढळून आले आहे. त्यामुळे हेच पाणी विषासम ठरते आहे. ज्यामुळे केसगळती आणि नखांशी संबंधित विकार आढळून येत असल्याचे बोलले जात आहे.