
पालघरमध्ये (Palghar) अज्ञात व्यक्तीकडून सीए असलेल्या एका जेष्ठ नागरिकाची हत्या (Murder) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना आज (15 जानेवारी) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, ही हत्या नेमकी कोणी केली? याचा पोलीस शोध घेत असून परिसरात चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलिसांनी घटनास्थळी संबंधित व्यक्तिचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
जयप्रकाश पोंदा असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते सीएच्या पदावर काम करत होते. जयप्रकाश डहाणू रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला शहरातील मुख्य रस्त्यावर जुन्या देना बँकेच्यासमोर एकटेच राहत होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरनी त्यांच्या घरी आल्या. त्यावेळी त्यांना जयप्रकाश यांचा मृतदेह आढळून आला. त्यावेळी या मोलकरनी महिलांनी या घटनेची वाच्यता केली. त्यानंतर जवळच्या रिक्षा स्टँडवर डहाणू रिक्षा चालक मालक युनियन संघटनेचे अध्यक्ष जयदेव पांडुरंग मर्द यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. हे देखील वाचा- Mumbai: मुंबईच्या कांदिवली येथील तबेल्यातील शेणाच्या खड्ड्यात पडल्याने 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
या घटनेने संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, दरोडेखोरांनी त्यांच्या घरात चोरीच्या उद्देशाने प्रवेश करून, ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज डहाणू पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीदेखील तपासण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात टीव्ही9 मराठीने वृत्त दिले आहे.