Mumbai: मुंबईच्या कांदिवली येथील तबेल्यातील शेणाच्या खड्ड्यात पडल्याने 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
Representational Image | (Photo Credits: ANI)

पंतग पकडण्यासाठी गेलेल्या एका दहा वर्षांच्या मुलाचा तबेल्यातील शेणाच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना मुंबईच्या (Mumbai) कांदिवली (Kandivali) परिसरात गुरुवारी घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. मृत मुलगा संक्रातीनिमित्त त्याच्या आईसोबत आजीच्या घरी आला होता. त्यावेळी पतंग पकडण्यासाठी गेले असताना तो जवळच्या तबेल्यातील शेणाच्या खड्ड्यात पडला. खड्ड्यात पडल्याचे पाहताच एका नागरिकाने इतर लोकांच्या मदतीने त्याला बाहेर काढले. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दुर्वैश जाधव असे या मुलाचे नाव असून तो इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहे. दुर्वेशचे वडील बिगारी काम तर, आई घरकाम करते. दरम्यान, मकर संक्रातीनिमित्त दुर्वेश हा आपल्या आईसोबत आजीच्या घरी आला होता. त्याची आजी कांदिवली येथील नवीन लिंक रस्ता परिसरातील लालजीपाडा भागातील एसआरएच्या एका इमारतीत राहते. या इमारतीच्या शेजारीच फाईव्ह स्टार नावाचा तबेला आहे. दुर्वेश हा खिडकीत असताना पंतग खाली पडल्याचे त्याला दिसले. त्यानंतर तो पतंग पडकण्यासाठी इमारतीच्या खाली आला. पतंग तबेल्यात पडल्याचे पाहून दुर्वेश आतमध्ये गेला. तबेल्यामध्ये सांडपाणी आणि शेणाची घाण वाहून जाण्यासाठी मुख्य गटाराला जोडणारा सुमारे सात ते आठ फूट खोल नाला खोदण्यात आला आहे. त्यात दुर्वेशचा पडून मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- Nagpur: पतंगाच्या मांजाने घेतला आणखी एकाचा जीव; नागपूर येथे गेल्या 10 दिवसांत तिसरा बळी

दुर्वेश हा त्यांच्या आई-वडिलांचा एकुलता एकच मुलगा होता. या घटनेनंतर जाधव कुटुंबियांवर दुख:चे डोंगर कोसळले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अस्कमात मृत्यूची नोंद केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली. पंतगामुळे दरवर्षी अनेक मृत्यूंची नोंद होते. याआधी नागपूर जिल्ह्यात मंगळवारी पतंगाच्या मांजाने गळा चिरल्याने एका 20 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे.