मुंबईची प्रसिद्ध राणीची बाग आता डिजिटल स्वरूपात; युट्यूब चॅनेल आणि ट्विटरच्या माध्यमातून जिजामाता उद्यान-प्राणीसंग्रहालयाला 'व्हर्च्युअल' भेट देणे शक्य
Jijamata Udyan (Photo Credits: Youtube)

मुंबई (Mumbai) शहरातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ, लहानांचे तसेच मोठ्यांचे आवडते ठिकाण वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (Veer Mata Jijabai Bhosale Udyan And Zoo) सध्याच्या देशव्यापी लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान डिजिटल स्वरूपात येण्यासाठी सज्ज झाले आहे. हे उद्यान राणीची बाग (Rani Baug) या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तर नुकतेच इंटरनेटवर या प्राणीसंग्रहालयातील दोन रॉयल बंगाल वाघ शक्ती आणि करिश्मा यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर प्राणीसंग्रहालयाचे अधिकारी उद्यानाच्या डिजिटल कल्पनेवर विचार करीत होते, अखेर हे उद्यान डिजिटल स्वरूपात आणण्याचा निर्णय घेण्यात आला.

भायखळा प्राणीसंग्रहालयाचे (Byculla zoo) संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी मिरर ऑनलाईनला याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, 'आम्ही मुंबईकरांचे लाडके प्राणीसंग्रहालय डिजिटल प्लॅटफॉर्मवर घेण्याचा विचार करीत आहोत. लॉकडाऊनमुळे आमचे सर्व शैक्षणिक उपक्रम आणि जनजागृती कार्यक्रम बंद पडले आहेत. आता आम्ही या सर्व गोष्टी ऑनलाईन घेण्याचे विचार करीत आहोत, जेणेकरुन लोक या गोष्टींचा पुन्हा अनुभव घेऊ शकतील. फक्त यूट्यूबच नाही, तर आम्ही आमचे स्वतःचे अधिकृत ट्विटर हँडल सुरु करण्याची योजना आखत आहोत, ज्याद्वारे लोकांशी अधिक चांगल्या पद्धतीने संपर्क साधने सुलभ होईल. प्राणिसंग्रहालयाच्या प्रशासकीय समितीकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला असून याबाबत अंतिम निर्णय होणे बाकी आहे.’ (हेही वाचा: आरे वसाहतीत सुरु होणार नवी 'राणीची बाग')

या उद्यानाने औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाकडून फेब्रुवारी महिन्यात विनिमय कार्यक्रमांतर्गत वाघांची जोडी खरेदी केली. त्यानंतर बर्‍याच काळापासून वाघ नसलेल्या या प्राणिसंग्रहालयाने आता आपल्या या नवीन प्रिय मित्रांसाठी रणथंभोर भूप्रदेशावर आधारित लँडस्केप तयार केला आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने, प्राणीसंग्रहालयातील अधिकारी प्राण्यांची तसेच त्यांची काळजी घेणार्‍या कर्मचार्‍यांची योग्य काळजी आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व उपाययोजना करीत आहेत. तर 50 एकराहून अधिक क्षेत्रात पसरलेले भायखळा प्राणीसंग्रहालय आणि उद्यान ही मुंबईतील सर्वात जुनी सार्वजनिक बाग आहे.