Rainfall (Image used for representational purpose only) (Photo Credits: PTI)

गुजरातमध्ये येणारे 'वायू' (Cyclone Vayu) चक्रीवादळाचे संकट तात्पुरते टळले असले तरीही वायू चक्रीवादळाची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे गुजरातसह संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत पावसाला सुरुवात झाली असली तरीही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. प्रत्येक मुंबईकर ज्या मुसळधार पावसाची वाट पाहत असतो तो पाऊस पडण्यासाठी अजून 7 दिवस वाट पाहावी लागणार आहे. हवामान खात्याने याविषयी माहिती दिली आहे.

'वायू' चक्रीवादळाचा धोका मुंबईला नसला तरीही वायू चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर झाला आहे. गुरूवारी मुंबईला चक्रीवादळाचा धोका असल्याची माहिती देण्यात आली होती. पण, हा धोका टळला होता. महाराष्ट्र, गुजरातसह किनारी राज्यांना याबाबत सतर्क करण्यात आलं होतं. त्याचबरोबर मुंबईकरांना आता आणखी 7 दिवस मान्सूनची वाट पाहावी लागणार असून हवामान खात्याने याबाबत माहिती दिली आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस पडला की 'मुंबापुरी' ची 'तुंबापुरी' होऊन जाते. त्यामुळे या यावर त्वरित उपाययोजना करता यावी म्हणून महापालिकेने युद्धपातळीवर काम सुरु केले आहे. मुंबईतील हिंदमाता, किंग्ज सर्कल, सायन आणि घाटकोपर या सखल भागांमध्ये पाणी साचते म्हणूनच उपाययोजना म्हणून येथे 232 पाणी उपसा पंप ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा: Monsoon 2019: मुंबई मध्ये मान्सून पूर्व सरी बरसल्या; मुलुंड परिसरात वीज पुरवठा खंडीत

आठवड्याभरापूर्वी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्याची राज्याला आता प्रतिक्षा लागून राहिली आहे. 13 ते 14 जूनला मान्सून राज्यात दाखल होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. पण, वायू चक्रीवादळामुळे मात्र मान्सूनच्या प्रगतीवर परिणाम झाला असून मुंबईकरांना आणखी आठवडाभर वाट पाहवी लागणार आहे.