Mumbai to Pune in 90 Minutes: आता MTHL मुळे अवघ्या 90 मिनिटात होणार मुंबई ते पुणे प्रवास; जाणून घ्या कसा असेल नवीन मार्ग
Mumbai to Pune in 90 Minutes (संग्रहित संपादित प्रतिमा)

मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) हा शिवडी आणि न्हावा शेवा (JNPT) दरम्यानचा सागरी पूल लवकरच बांधण्यात येणार आहे. एका अहवालानुसार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे बांधण्यात येत असलेल्या या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे बांधकाम 2024 पर्यंत पूर्ण होईल. या पुलाच्या निर्मितीमुळे प्रवाशांना अवघ्या 90 मिनिटांत मुंबई ते पुणे प्रवास करता येणार आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची लांबी सुमारे 21.8 किमी आहे आणि त्याच्या बांधकामानंतर दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. यासोबतच मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या नागरिकांनादेखील या पुलाची मोठी मदत होणार आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबई शहरामधील गर्दी कमी होण्यास मदत होणार असून, याद्वारे नवी मुंबईच्या विकासालाही चालना मिळणार आहे. या लिंकमध्ये शिवडी, शिवाजी नगर आणि चिर्ले येथे इंटरचेंज असेल. मुंबई ते पुणे प्रवास करण्यासाठी सध्या PD’Mello Road त्यानंतर Freeway, Sion-Panvel Expressway वरून पुढे Mumbai-Pune Expressway व गोव्याला जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग 48 आणि राष्ट्रीय महामार्ग 748 असा मार्ग आहे.

जर प्रवाशांनी पुण्याला जाण्यासाठी हा मार्ग घेतला तर त्यांना सुमारे 150 किलोमीटरचे अंतर कापावे लागते. त्यासाठी तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. परंतु आता मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे प्रवाशांना हे अंतर अवघ्या 90 मिनिटांत कापता येणार आहे.

असा असेल मुंबई-पुणे नवीन मार्ग- 

P D’Mello Road त्यानंतर Freeway (शिवारीच्या पुढे बाहेर पडा), त्यानंतर MTHL व पुढे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळून चिर्ले मार्गे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग. (हेही वाचा: मुंबईत आता दुचाकीवर बसलेल्या दोघांनाही हेल्मेट घालणं सक्तीचं; पहा नियम मोडल्यास कितीचा दंड!)

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक सुमारे 17,843 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. तो ईपीसी मॉडेलनुसार तयार केला जात आहे. प्रकल्पाच्या खर्चाच्या सुमारे 85 टक्के खर्च जपान कोऑपरेशन एजन्सीद्वारे केला जात आहे. या प्रकल्पाचे सुमारे 77 टक्के काम मे 2022 पर्यंत पूर्ण होईल व 2024 पासून हा मार्ग वापरासाठी खुला होईल.