Mumbai Sindhudurg Flight Booking: येत्या 9 ऑक्टोंबर ला चिपी विमानतळाचे उद्घाटन पार पाडले जाणार आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या दिवसापासूनच मुंबई- सिंधुदुर्ग विमानसेवा सुरु होणार आहे. तत्पूर्वी या मार्गावरील विमानसेवा सुरु होण्याआधीच तिकिट बुकिंग फुल्ल झाले आहे. तर येत्या 20 ऑक्टोंबर पर्यंतचे तिकिट बुकिंग फुल्ल असून अवघ्या एका तासात लोकांनी बुकिंग केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई- सिंधुदुर्ग विमानसेवा एअर इंडिया कडून दिली जाणार आहे. त्यानुसार ऑनलाईन तिकिट बुकिंग नागरिकांसाठी सुरु केले गेले. मात्र अवघ्या तासाभरातच जाण्याचे आणि रिटर्न तिकिटे बुकिंग झाली आहेत. याबद्दलची माहिती एअर इंडियाच्या वेबसाइटवर ही दिसून येत आहे.(महिला पोलिस कर्मचार्यांचे कामाचे तास 12 वरून 8 तास करणार; Maharashtra DGP Sanjay Pandey यांची माहिती)
तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी असे म्हटले की, हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिंया यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग विमानसेवा ही फ्लाइट 9I 661 द्वारे मुंबईला सकाळी 11.35 वाजता पोहचणार आहे. तसेच दुपारी 1 वाजता ते सिंधुदुर्गमध्ये दाखल होईल.(School & College Reopen: राज्यातील शाळा, महाविद्यालयं कधी सुरु होणार? पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार)
तसेच फ्लाइट 9I 662 हे सिंधुदुर्गवरुन दुपारी 1.25 वाजता निघणार असून मुंबईत दुपारी 2.50 मिनिटांनी येणार आहे. मुंबई-सिंधुदुर्ग दरम्यानच्या प्रवासासाठी 2520 रुपये आणि सिंधुदुर्ग-मुंबईसाठी तिकिट 2621 रुपये असणार आहे.
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ हे पहिलेच हरित विमानतळ असणार आहे. यासाठी 800 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या विमानतळामुळे आर्थिक वाढ होण्यासह स्थानिकांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे आयआरबी सिंधुदुर्ग प्रायव्हेट लिमिटेड यांनी म्हटले आहे.