प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे राज्यात बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालयं पुन्हा कधी सुरु होणार? असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना मागील अनेक दिवसांपासून पडला आहे. राज्यातील महाविद्यालयं 1 नोव्हेंबर पासून सुरु करण्याचा मानस असल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी यापूर्वी म्हटले होते. तर जिल्ह्यांमधील कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी म्हटलं होतं. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

"राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थिती योग्य वाटल्यास 2 ऑक्टोबरपासून वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमांबाबत योग्य ती नियमावली लागू करुन महाविद्यालयं टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने घेण्यात येऊ शकतो," असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव किती आहे यावर शाळा-महाविद्यालयं कधी सुरु होणार, हे अवलंबून असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Maharashtra School Reopening: कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शाळेत Health Clinic उभारणार)

पहा व्हिडिओ:

दरम्यान, 18 वर्षांवरील महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावं, असं आवाहनी अजित पवार यांनी यावेळी केलं आहे. तसंच जागतिक आरोग्य संघटनेच्या परवानगीनंतर शालेय मुलांना लस देण्याला प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे दिवाळीनंतर शाळा सुरु करणे सोयीचे होईल, असा सरकारचा विचार असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.