मुंबईमध्ये (Mumbai) एका 18 वर्षीय तरुणाने गेल्या गुरुवारी दादरच्या प्रभादेवी येथे त्याच्या घरी आत्महत्या (Suicide) केली. कथितपणे तरुणाने आपल्या मालकांकडे पगार मागितल्यानंतर, त्याच्या दोन मालकांनी आणि त्यांच्या साथीदारांनी या तरुणाचे कपडे उतरवून त्याची परेड केली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांनी या तरुणाने आपले जीवन संपवले. मुलाच्या वडिलांनी मंगळवारी हा दावा केला. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. याबाबत एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात शनिवारी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली, परंतु एफआयआर दाखल करण्यात आला नाही.
पोलीस तक्रार दाखल करणारे वडील रामराज जैस्वार यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, जेव्हा ते त्यांचा मुलगा पंकजचा मृतदेह नायर रुग्णालयात पाहण्यासाठी गेले तेव्हा त्यांना दिसले की, मुलाचे मुंडण केले होते आणि डोके राखेने काळे केलेले होते. परंतु याबाबत अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील चंद्रमोरे यांनी दिली.
टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या रामराज यांनी सांगितले की, पंकजने वाराणसीहून मुंबईला गेल्यानंतर स्थानिक किराणा दुकानात हेल्पर म्हणून काम करायला सुरुवात केली. त्याला 12,000 रुपये मासिक पगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याच्या मालकाने त्याला ती रक्कम दिली नाही. तेथे पाच ते सहा महिने काम केल्यानंतर पंकजने या वर्षी नोकरी सोडल्याचेही त्यांनी सांगितले.
मात्र, मार्चमध्ये, त्याच्या पूर्वीच्या मालकाच्या भावाने त्याच्या पान दुकानात काम करण्याबद्दल परागशी संपर्क साधला. पंकजने ऑफर स्वीकारली, मात्र पान दुकानात काम करत असताना तो मागील सहा महिन्यांचा किराणा मालाच्या दुकानातील पगार मागत राहिला. पंकजने पगाराचा आग्रह धरल्यामुळे गुरुवारी दुपारी किराणा आणि पान दुकानातील त्याच्या मालकांनी आपल्या साथीदारांसह त्याच्यावर हल्ला केला. (हेही वाचा: Mumbai Shocker: मुंबईत कॉपी करताना पकडल्यानंतर विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल)
सुरुवातीला त्यांनी त्याला एका न्हाव्याकडे नेले आणि त्याचे मुंडन केले. त्यानंतर राखेने त्याचा चेहरा आणि डोके काळे केले. नंतर त्याचे कपडे उतरवून त्याला शेजारच्या परिसरात फिरवले. शुक्रवारी मुलावर अंतिम संस्कार केल्यानंतर रामराज यांनी शनिवारी संध्याकाळी एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार अर्ज दाखल केला.