एखाद्याला विश्वासाने रक्षणाची जबाबादीर द्यावी आणि त्यानेच केसाने गळा कापावा, अशी घटना मुंबई येथील एका स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Bank Fraud Case) शाखेत घडली आहे. भांडूप येथील एसबीआय शाखेत ठेवीदारांनी ठेवलेले तब्बल तीन कोटी रुपयांचे सोने गायब आहे. धक्कादायक म्हणजे पोलिस तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार या सोन्याची चोरी झाली आहे. ही चोरी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर बँक मॅनेजर पदावरील व्यक्तीने केली आहे. मनोज म्हस्के असे त्याचे नाव आहे. त्याला ऑनलाईन बेटिंग (Online Betting) खेळण्याचा नाद होता. त्यात त्याने बँकेचे लॉकर फोडले आणि त्यातील सुमारे तीन कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी केली. ही घटा भांडूप पश्चिम परिसरात घडली.
ग्राहकांच्या सोन्यावर डल्ला
बँकेतील लॉकर फोडल्याची आणि सोने गायब असल्याची माहिती पुढे येताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी केलेल्या तपासात या प्रकरणा बँक मॅनेजरचा हात असल्याचे पुढे आले. पोलिसांनी एसबीआय मॅनेजर आणि त्यास चोरलेल्या सोन्याची विक्री करण्यास मदत करणाऱ्या आणखी एकास अटक केली आहे. त्यापैकी बँक मॅनेजरचे नाव मनोज म्हस्के तर फरीद शेख असे दुसऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मनोज हा एसबीआयच्या मुलुंड शाखेत पर्सनल ब्रँच सर्व्हिस मॅनेजर पदावर कर्तव्यास होता. फरीद शेख याच्याबाबतचा तपशील अद्याप पुढे आला नाही. मात्र, तो मनोज यास सोने विक्रीस मदत करत असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे. (हेही वाचा, Mumbai News: 7.43 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी 28 वर्षीय तरुणाला अटक, बोरिवली पोलिसांकडून कारवाई)
कॅश इनचार्जमुळे प्रकरणाचा भांडाफोड
मुलुंड-नाहूर येथील रुनवाल ग्रीन येथे एसबीआयची शाखा आहे. या शाखेत प्रशासक असलेल्या अमित कुमार यांनी या प्रकरणी भांडुप पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार बँकेच्या ठेविदारांनी आणि ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर बँकेकडे सोने ठवले होते. यातील काही सोने ठेव म्हणून आले होते तर काही सोने तारण म्हणून आले होते. या लॉकरला दोन चाव्या असतात. केवळ दोन चाव्यांच्या सहाय्यानेच हे लॉकर उघडता येतात. मात्र, यातील एक चावी ही बँक मॅनेजरकडे असते तर दुसरी चावी कॅश इनचार्जकडे काम करणाऱ्या व्यक्तीकडे असते. त्यामुळे लॉकर या दोघांपैकीच कोणीतरी उघडला असणार हे नक्की होते.
63 पैकी सोन्याची 59 पाकिटे गायब
दरम्यान, पोलीस तक्रारीत पुढे आलेल्या माहितीनुसार, मनोज म्हस्के 27 फेब्रुवारी (2024) रजेवर होते. त्यामुळे लॉकरची चावी अमित कुमार यांच्याकडे होती. दरम्यानच्या काळात अमित कुमार हे ग्राहकांचे सोने लॉकरमध्ये जमा करण्यासाठी गेले असता त्यांना सोन्याची अनेक पाकिटे गायब असल्याचे लक्षात आले. समोरचा प्रकार पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी तातडीने कागदपत्रे तपासली. तपासलेल्या कागदपत्रांनुसार त्यांना लक्षात आले की, बँकेच्या शाखेने 63 ग्राहकांना सोने तारण कर्ज दिले होते. तारण म्हणून आलेले सोने वेगवेगळ्या पाकिटांमध्ये भरुन ती पाकिटे लॉकरमध्ये ठेवण्यात आली होती. लॉकरमध्ये ठेवलेल्या 63 पैकी 59 पाकिटे गायब होती. त्यामुळे आत लॉकरमध्ये केवळ 4 पाकिटेच शिल्लख होती.
अमित कुमार यांनी तातडीने ही बाब वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली. दरम्यान, वरिष्ठांनी तातडीने बँकेत धाव घेत पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सुट्टीवर असलेल्या असलेल्या सर्व्हिस मॅनेजर मनोज म्हस्के याला तातडीने बोलावून घेतले. विशेष म्हणजे म्हस्के याने हे सोने आपणच गायब केले आहे. यातील काही सोने आपण तारण ठेवले आहे तर काही सोने आपण विकले असल्याची कबुली दिली. धक्कादायक म्हणजे हे सोने आपण लवकरच परत करु त्यासाठी थोडासा वेळ द्या अशी मागणी करत आरोपीने शेखी मिरविण्याचाही प्रयत्नकेला. मात्र, बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने भांडुप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.