building

Mumbai Real Estate Prices: महागडे व्याजदर आणि मालमत्तेच्या वाढत्या किमती असूनही, भारतात मालमत्तेची मागणी कायम आहे. मुंबईमध्ये (Mumbai) तर रिअल इस्टेटच्या किंमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. दुसरीकडे अमेरिकन बाजारात उलटे चित्र पहायला मिळत आहे. इथे रिअल इस्टेटमध्ये घसरण होत आहे आणि मालमत्तेच्या किमतीत लक्षणीय घट होताना दिसत आहे. नुकतेच उद्योजक उदय कोटक (Uday Kotak) यांनी न्यूयॉर्कमधील (New York) महागड्या परिसरात मुंबईमधील बीकेसीच्या तुलनेत स्वस्त दरात मालमत्ता मिळत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसी हा मुंबई शहरातील एक व्यावसायिक आणि निवासी परिसर आहे. हे एक प्रमुख उच्च दर्जाचे व्यावसायिक केंद्र असून इथल्या जागांच्या किंमती या देशातील सर्वात जास्त मालमत्ता दरांपैकी समजल्या जातात. महत्वाची बाब म्हणजे, बीकेसीमधील मालमत्ता दर हे न्यू यॉर्कमधील व्यावसायिक कार्यालय इमारतींच्या दरांपेक्षा दुप्पट आहेत. याबाबत  उद्योगपती उदय कोटक यांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही.

उदय कोटक यांनी एका यूजरच्या कमेंटला रिट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. युजरने ट्विट केले होते की, 'न्यूयॉर्क कमर्शियल ऑफिस बिल्डिंग स्पेस रु. 16,000/स्क्वेअर फूटमध्ये उपलब्ध आहे.' याला रिट्विट करत उदय कोटक यांनी लिहिले, 'वाह निलेश. मुंबईतील बीकेसीच्या तुलनेत हा दर निम्म्याहून कमी आहे.'

अहवालानुसार, 222 ब्रॉडवे येथील 778 स्क्वेअर फूट टॉवर $150 दशलक्षला विकला गेला आहे. तर गेल्या वेळी 2014 मध्ये तो 500 दशलक्ष डॉलर्समध्ये विकला गेला होता. एका गुंतवणूकदाराच्या पोस्टनुसार, न्यूयॉर्क शहरातील व्यावसायिक रिअल इस्टेट ऑफिस इमारतींच्या किमतींमध्ये मोठी घट झाली आहे.

भारतात घरांची परवडणारीता ही एक गंभीर समस्या आहे. विशेषत: मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये ही समस्या अधिक खोलवर आहे. नाइट फ्रँकच्या अहवालानुसार, 2023 च्या उत्तरार्धात आशिया-पॅसिफिक निवासी बाजारपेठांमध्ये वार्षिक किमतीच्या वाढीच्या बाबतीत बेंगळुरू आणि मुंबई अनुक्रमे 8 व्या आणि 9व्या स्थानावर आहेत. भारतामधील मालमत्तांच्या वाढत्या किंमती पाहता फोर्ब्स ग्लोबल प्रॉपर्टीजने भारतीय रिअल इस्टेट मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. इंडिया फोर्ब्स ग्लोबल प्रॉपर्टीजने भारतात एक आलिशान प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने मुंबई, दिल्ली आणि गोवा येथे अंदाजे 11 दशलक्ष चौरस फूट निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता बांधण्याची घोषणा केली आहे. (हेही वाचा: Byculla Zoo : राणीच्या बागेत 50 प्राण्यांचा मृत्यू, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर)

दरम्यान, 1980 पासून बीकेसीमध्ये अनेक टप्प्यांत 300 इमारती बांधण्यात आल्या आहेत. 1977 मध्ये राज्य सरकारने नरिमन पॉइंटची गर्दी कमी करण्यासाठी बीकेसीला व्यावसायिक केंद्र बनवण्याची कल्पना मांडली होती. 1975 मध्ये येथील जमिनीचा दर 3,000 रुपये प्रति चौरस मीटरपासून सुरू झाला होता, जो 2016 मध्ये वाढून 3 लाख रुपये प्रति चौरस मीटर झाला आहे. या ठिकाणी आरबीआय, आयकर, कौटुंबिक न्यायालयसह अनेक बँकांची मुख्य कार्यालये, अनेक देशांचे दूतावास आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मैदान आहे. याशिवाय येथे निवासी संकुलेही बांधली आहेत.