Mumbai Train (Photo Credits: ANI)

Mumbai Rain and Local Train Update: रविवारी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने मुंबईत चांगलेच बस्तान मांडले असून सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले असून रेल्वे रुळांवरही पाणी साचल्याने मुंबईची लाईफलाईन मंदावली आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने, पश्चिम मार्गावरील वाहतूक 15 मिनिटे तर हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहे.

मुसळधार पावसामुळे सायन-माटुंगा रेल्वेरुळांवर पाणी साचले असून ठाणे, डोंबिवली, कल्याण या भागातील जोरदार पाऊस सुरु आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे पालघर स्टेशनवर एक्सप्रेस गाड्या रखडल्या आहेत.

मुंबई शहर, पश्चिम आणि पुर्व उपनगर, पालघर मध्ये रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. हिंदमाता, सायन, गांधी मार्केट, अंधेरी सबवे, वाकोला, कुर्ला पश्चिम या सखल भागात पाणी साचले आहे.

हेही वाचा- Maharashtra Monsoon 2019 Live Updates: पावसामुळे आधीच रेल्वेसेवा विस्कळीत; मरीन लाईन्स स्थानकात ओव्हरहेड वायर तुटली

या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने सकाळी शाळेत निघालेली मुले गुडघाभर पाण्यात रस्ता काढत जात असतानाचे चित्र दादर परिसरात पाहायला मिळतेय.

पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मुंबईची लाईफलाईन ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे घराबाहेर पडताना चाकरमान्यांनी तसेच शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सद्य परिस्थिती पाहून घराबाहेर पडावे असा सल्ला महापालिकेने दिला आहे.