Mumbai local train | Representational Image | (Photo Credits: PTI)

गेले 3 दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने आज विश्रांती घेतली असली तरीही या पावसाने मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकलसेवा देखील पूर्णपणे कोलमडलेली होती. यात अनेक लोकल फे-या रद्द करण्यात आल्या. आज पावसाचा जोर कमी असल्यामुळे हळूहळू रेल्वेरुळांवरील साचलेले पाणी ओसरुन रेल्वेसेवा पूर्वपदावर येत आहे. मात्र मध्य रेल्वेच्या कर्जत-कल्याण (Karjat-Kalyan) मार्गावरील रेल्वेसेवा पुर्ववत होण्यास मंगळवार उजाडण्याची शक्यता मध्य रेल्वेकडून वर्तवली जात आहे.

सोमवारी पहाटेपासून धिम्या गतीने लोकलसेवा सुरु झाली. मध्य रेल्वेच्या गाड्या 20 मिनिटाने धावत आहेत. यात आता अंबरनाथ-कर्जत (Ambernath-Karjat) आणि टिटवाळा-कसारा (Tilwala-Kasara) ही या मार्गावरील लोकलसेवा सुरु होण्यास अजून विलंब लागणार असून कर्जत-कल्याण या मार्गावरील लोकलसेवा सुरु होण्यास मंगळवार उजाडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण कर्जतदरम्यानची सिग्नल यंत्रणा बिघडली आहे. तसेच रुळांखालची खडी आणि माती वाहून गेली आहे. त्यामुळे या सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी थोडा विलंब लागू शकतो असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

तसेच मुसळधार पावसाचा फटका मोनोरेललाही बसला असून वीजपुरवठा खंडीत झाल्याने मोनोरेल ठप्प झाली आहे. तसेच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस रद्द झाल्याने मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. याआधी 2 जुलै रोजी झालेल्या पावसानेही मुंबईची अशीच दाणादाण उडवली होती. मध्य रेल्वे 16 तास बंद होती. आता यावेळीही दोन दिवस झालेल्या पावसामुळे लोकल वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. ही सेवा पूर्ववत येण्यास किती वेळ लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा- मुसळधार पावसामुळे उद्या मध्ये रेल्वेच्या वाहतुकीमध्ये बदल; वेळापत्रक पाहूनच प्रवास करण्याचे आवाहन

सुट्टीचा दिवस असल्या कारणाने चाकरमान्यांना जास्त समस्येचा सामना करावा लागणार नाही, मात्र आज आठवड्याचा पहिला दिवस असल्याकारणाने रेल्वेच्या दिरंगाईमुळे चाकरमान्यांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.