मुंबई (Mumbai) आणि परिसरात सुरु असलेला पाऊस थांबायची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यात आज संध्याकाळी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या 48 तासांमध्ये मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुसळधार पावसाचा सर्वात पहिला फटका बसतो तो वाहतूक व्यवस्थेला. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा ठप्प होते. मात्र आता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मध्ये रेल्वेने (Central Railway) खबरदारी घेतली आहे. मध्य रेल्वेच्या उद्याच्या गाड्यांचे बदल जाहीर करण्यात आले आहेत.
CR update for suburban services tomorrow. pic.twitter.com/GxsOOYpthZ
— Central Railway (@Central_Railway) August 4, 2019
मध्ये रेल्वेने ट्विट करत ही माहिती दिली आहे. ‘उद्याच्या परिस्थितीनुसार मध्य रेल्वे सीएसएमटी (CSMT) ते कल्याण, सीएसएमटी ते गोरेगाव, सीएसएमटी ते पनवेल, ठाणे ते पनवेल आणि चौथ्या कॉरिडोर ते खारकोपर या उपनगरी सेवा चालविल्या जातील. या पत्रकात म्हटल्याप्रमाणे उद्या सकाळच्या हवामानानुसार कल्याण ते बदलापूर आणि कसारा या ठिकाणच्या सेवा चालविल्या जातील.
सध्या मोठ्या पातळीवर दुरुस्तीची कामे चालू आहेत, तसेच अजूनही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅकचे नुकसान झाल्यामुळे उद्या बदलापुरच्या पुढे सेवा पुरवणे शक्य नाही. हा निसर्गाचा संताप आहे आणि रेल्वे प्रशासन या सेवा व्यवस्थित चालू राहण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी आम्हाला सहकार्य करा आणि रेल्वेचे बदलत असलेले वेळापत्रक पाहूनच प्रवास करा.’ असे मध्ये रेल्वेने म्हटले आहे. (हेही वाचा: येत्या 48 तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; उद्या शाळा आणि महाविद्यालये बंद, BMC कडून सतर्क राहण्याचे आव्हान)
दरम्यान, गेले दोन दिवस मुंबई (Mumbai) आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक अशा अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नुकतेच हवामान विभागाने पुढील 48 तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने (BMC) सर्व खाजगी आणि सार्वजनिक शाळा आणि महाविद्यालये उद्या (5 ऑगस्ट) बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.