File image of rains in Mumbai | (Photo Credits: PTI)

गेले दोन दिवस मुंबई (Mumbai) आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक अशा अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नुकतेच हवामान विभागाने पुढील 48 तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने (BMC) सर्व खाजगी आणि सार्वजनिक शाळा आणि महाविद्यालये उद्या (5 ऑगस्ट) बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एक ट्विट करत बीएमसी ने ही माहिती दिली आहे.

आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा पुरविणारी काही सरकारी कार्यालये चालू राहतील. तर खाजगी कार्यालयातील कर्मचारी केवळ आवश्यक असल्यास किंवा काही महत्वाचे काम असल्यास बाहेर जावे असेही सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पालघर, ठाणे, रायगड, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यातील शाळा व काॅलेजना सुट्टी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

शासकीय कार्यालयात कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोहोचण्यास विलंब झाल्यास उशीरा येण्याची सवलत देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. मात्र उद्या सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील शाळांनाही उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.