मुंबई-पुणे रेल्वे ब्लॉकमुळे स्वारगेट येथून प्रवाशांसाठी जादा एसटी बसची सोय
ST Bus (Photo Credits: Twitter)

येत्या 26 जुलै ते 9 ऑगस्ट पर्यंत मुंबई-पुणे (Mumbai-Pune) रेल्वेमार्गावर ब्लॉक घेण्यात येणार असून लांब पल्ल्याच्या गाड्या या काळात रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे सिंहगड आणि प्रगती एक्सप्रेसला याचा फटका बसणार असून नागरिकांची कोंडी होणार आहे. परंतु एसटी (ST) महामंडळातर्फे स्वारगेट येथून प्रवाशांसाठी जादा बसची सोय करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

लोणावळा- कर्जत दरम्यानच्या रेल्वेमार्गावर दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात कोणताही दुर्घटना घडू नये म्हणून मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्याचा निर्णय प्रशासनाने जाहीर केला आहे. तसेच काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल सुद्धा करण्यात आले आहेत.(मुंबई ते पुणे दरम्यान तांत्रिक दुरुस्ती; सिंहगड तसेच प्रगती एक्स्प्रेस तब्बल आठ दिवस बंद, अनेक ट्रेनच्या मार्गात बदल)

तब्बल आठ दिवसांच्या या ब्लॉकमध्ये कोयना, सह्याद्री आणि महालक्ष्मी या मुंबई येथून सुटणाऱ्या एक्सप्रेस आता पुणे येथून सोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी तर्फे स्वारगेट, पुणे स्थानकातून 25 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्याचसोबत लोणावळा येथून सुद्धा जादा 10 गाड्या सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.