Coronavirus: वरळी आणि धारावीत लॉकडाऊनचं उल्लघंन करणाऱ्यांवर ड्रोनद्वारे नजर; मुंबई पोलिस ड्रोनला स्पीकर लावून देणार सुचना
Drones (PC - ANI)

Coronavrius: मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईतील काही ठिकाणं कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. दाट लोकवस्ती असेलेल्या धारावी आणि वरळी (Dharavi and Worli) भागांवर आता ड्रोनची (Drones) नजर असणार आहे. या भागांमध्ये मुंबई पोलिस (Mumbai Police) ड्रोनला स्पीकर लावून त्याद्वारे जनतेला गर्दी करु नका, घरीच बसा अशा सुचना देणार आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांनी आज वरळी कोळीवाड्याची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी या ड्रोनच्या प्रात्यक्षिकाची पाहणी केली. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

धारावी परिसरात आज कोरोनाचे 6 नवे रुग्ण आढळले असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात आतापर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 55 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा परिसर दाट लोकवस्तीचा असल्यामुळे येथील कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - मुंबई: धारावी मध्ये 6 नवे COVID-19 बाधित, या परिसरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 55 वर)

दरम्यान, अनिल देशमुख यांनी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, घराच्या बाहेर पडू नये, फक्त भाजीपाला आणि किराणा घेण्यासाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन केले आहे. वरळी आणि धारावी भागातील नागरिकांना 'घरी रहा सुरक्षित रहा' हा संदेश देण्यासाठी या ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.