MLA Residence Mumbai: आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याच्या फोन कॉलने खळबळ,  इमारत मध्यरात्री केली रिकामी
MLA Residence Mumbai | (Photo Credits: ANI)

मुंबईतील मंत्रालय (Mantralaya Mumbai) इमारतीला लागूनच असलेले आकाशवाणी आमदार निवास (MLA Residence) उडवून देण्याची धमकी आली आणि एकच खळबळ उडाली. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास आमदार निवासातील फोनवर अज्ञाताने फोन केला आणि हे निवास्थान उडवून देण्याची धमकी दिली. त्यानंतर मुंबई पोलीस ( Mumbai Police) सतर्क झाले. कोणताही धोका न पत्करता मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव अख्ख आमदार निवास तातडीने खाली केले. या वेळी आमदार निवासात 150 लोक असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान 'मातोश्री' उडवून देण्याची अज्ञाताकडून धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट आहेत. पोलिसांनी 'मातोश्री' बाहेरील सुरक्षा वाढवली आहे. दरम्यान, आता आमदार निवास उडवून देण्याच्या धमकीमुळे एकच गोंधळ उडाला आणि पोलिसांनी मग इमारत खाली केली. दरम्यान, बॉम्ब शोध पधक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरु झाला.

दरम्यान, कोणताही धोका नको म्हणून पोलिसांनी आमदार निवासात असलेले सर्व आमदार, कर्मचारी, नागरिक यांना बाहेर काढले. बॉम्ब शोध पथकाने आमदार निवासातील प्रत्येक खोली तपासली. तत्पूर्वी खबरदारी म्हणून आमदार निवास इमारतीपासून साधारण 50 मिटर अंतरापर्यंत बॅरिकेट्सही लावण्यात आले. सर्वत्र कसून चौकशी केली मात्र, बॉम्ब अथवा, बॉम्बसदृश्य कोणतीही वस्तू आढळून आली नाही. (हेही वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री' उडवून देण्याची धमकी, दुबई येथून फोन)

प्राप्त माहितीनुसार, अज्ञाताकडून आमदार निवासातील फोनवर धमकीचा फोन आला. आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी या प्रकाराची माहिती मुंबई पोलिसांना तातडीने दिली. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत कसून चौकशी केली. परंतू, रात्रभर शोधाशोध करुनही धमकीत कोणतेही तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे कोणीतरी खोडसाळपणा केला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तरीही, हा फोन कोठुन आला, कोणी केला याबाबत पोलीस तपास करत आहेत.