मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! लहान मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक करून दोन चिमुकल्यांना दिले जीवनदान
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबई पोलिसांच्या (Mumbai police) चेंबूर (Chembur)  कक्षाने पैशाच्या बदल्यात लहान मुलांची तस्करी (Children Trafficking) करणाऱ्या एका टोळीला अलीकडेच गजाआड केले आहे. या टोळीमध्ये चार महिलांचा समावेश असून गरीब कुटुंबातील लहान मुलांना दत्तक देण्याच्या नावाखाली त्या लाखो रुपयांचा कारभार करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय या टोळीकडून मुलांना विकत घेणाऱ्या दोघांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर आरोपींच्या तावडीतून सुटका केलेल्या दोन बालकांना सध्या बालसुधारकगृहात ठेवण्यात आले आहे. आश्चर्य म्हणजे लहानग्यांची तस्करी करणाऱ्या या चार ही आरोपी महिला या आधी रुग्णालयात काम करत होत्या. सुनंदा मसाने (30), सविता साळुंखे-चव्हाण (30), भाग्यश्री कोळी (26) आणि आशा ऊर्फ ललिता जोसेफ (35) अशी टोळीतील महिलांची नावे आहेत. तर अमर देसाई आणि भाग्यश्री कदम  हे लहान मुलांचे खरेदीदार आहेत.

काय होतं नेमकं प्रकरण?

या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी गरीब कुटुंबातील महिलांना हेरून त्यांचे ब्रेनवॉश करत असे. आपल्या मुलांना हे गरीब पालक सांभाळू शकत नाही परिणामी त्यांच्या आयुष्याशी हेळसांड होते असे सांगून या महिला मुलांच्या पालकांना भुलवायच्या. एकदा का हे पालक आपल्या बोलण्यात अडकल्याची अंदाज आला की मग त्या मुलांना दत्तक देण्याचा पर्याय महिलांसमोर ठेवत असे. हा त्यांचा नेहमीचा फंडा होता. महाराष्ट्रात बिहार येथून अल्पवयीन मुलांची तस्करी, RPF च्या कारवाईमुळे खुलासा

यावेळी त्यात अडकलेल्या दोन्ही महिला अशिक्षित होत्या . त्यामुळे मूल दत्तक देण्यासाठी किंवा घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया असते याबाबत त्यांना काहीच माहिती नव्हती. केवळ या महिलांच्या आमिषाला बळी पडून या दोन्ही मातांनी आपली मुले टोळीला दिली. त्या बदल्यात टोळीने त्यांना एक ते दीड लाख रुपये दिले. पुढे या टोळीने ही बालके अडीच ते चार लाख रुपयांना विकली.

दरम्यान, आरोपींपैकी साळुंखे गोवंडी येथील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्त आहे. तीन वर्षांपूर्वी तिला बाळचोरी प्रकरणात अटक झाली होती. त्या प्रकरणात जामिनावर येताच तिने पुन्हा गुन्हेगारी सुरू ठेवल्याची माहिती पथकाला मिळाली. तर कोळी एका खाजगी दवाखान्यात समन्वयक म्हणून काम करते, तर जोसेफ सरोगसी करणाऱ्या संस्थांबरोबर काम करते. मूल विकत घेणाऱ्या देसाईला तीन मुली असून मुलगा हवा होता, तर कोळी हिला मूल होत नव्हते. त्यामुळे ते या टोळीच्या संपर्कात आले, अशी माहिती पथकाला मिळाली आहे.