उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे निवासस्थान अँटीलीया (Antilia) चा पत्ता विचारणाऱ्या व्यक्तीस मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ताब्यात घेतले आहे. सखोल चौकशी केल्यानंतर संबंधित इसमाकडून पोलिसांना मिळालेली माहिती मजेशीर होती. ती ऐकून पोलिसांनीही सुटेचा निश्वास सोडला. एका टॅक्सी चालकाने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करुन दोन संशयास्पद व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाचा पत्ता विचारत असल्याची माहिती दिली आहे.
मुंबई पोलिसांनी टॅक्सी चालकाच्या फोननंतर शोधमोहीम सुरु केली. अखेर तो पत्ता विचारणारा इसम नवी मुंबई येथे पोलिसांच्या हाती लागला. नवी मुंबई येथूनच पोलिसांनी या इसमास ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या प्रथमिक चौकशीत पुढे आले की, हा इसम सर्वसामान्य असून तो केवळ एंटीलिया पाहण्यासाठी पत्ता विचारत होता. ज्या गाडीतून त्याने पत्ता विचारला ती गाडी वॅगन आर होती. जी पोलिसांनी शोधून काढली आहे. ही एक टूरीस्ट गाडी होती. तसेच, ज्या व्यक्तीला पत्ता विचारला तो एक गुजराती टॅक्सी चालक होता. हा चालकही टुरिस्ट टॅक्सी चालवतो. पोलिसांच्या प्रथमिक चौकशी कोणत्याही प्रकारची संशयास्पद माहिती मिळाली नाही. (हेही वाचा, मुकेश अंबानी यांचे निवास्थान Antilia बाहेर सुरक्षा वाढवली, टॅक्सी चालकाने पोलिसांना दिली संशयीतांबाबत माहिती)
मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत. मुकेश अंबानी यांची सुरक्षा पाठीमागील फेब्रुवारी महिन्यापासून अधिकच वाढविण्यात आली आहे. मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय 2012 पासून दक्षिण मुंबई येथील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कम्बाला हिल परिसरात एका आलिशान घरात राहतात. ते राहात असलेली इमारत 27 मजल्यांची आणि 400,000 चौरस फुटांची आहे. या इमारतील एंटीलिया असेही म्हटले जाते.