Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कस्तुरबा प्रयोगशाळेत पाठवलेल्या एकूण नमुन्यांपैकी 100 टक्के नमुन्यांमध्ये ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंट आढळला आहे. त्यामुळे अजूनही मुंबईमधील कोरोनाचा धोका कमी झाला नसल्याचे समोर येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) दहाव्या जीनोम सिक्वेन्सिंग (Genome Sequencing) अहवालात कस्तुरबा प्रयोगशाळेत पाठवलेल्या सर्व नमुन्यांमध्ये ओमायक्रॉन प्रकार आढळून आल्याचे समोर आले आहे. नागरी संस्थेने अनुक्रमासाठी 237 नमुने पाठवले होते, त्यापैकी सर्वच्या सर्व नमुन्यांमध्ये ओमायक्रॉन होता. यामुळे कोविड प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 10 व्या जीनोम सिक्वेन्सिंग फेरीसाठी एकूण 376 नमुने तपासण्यात आले. यापैकी 237 नमुने बीएमसी क्षेत्रातील, तर उर्वरित नमुने बीएमसी क्षेत्राबाहेरील आहेत. बीएमसी क्षेत्रातील 237 नमुन्यांपैकी 100%, म्हणजेच सर्व 237 नमुने 'ओमायक्रॉन' या उपप्रकाराने संक्रमित असल्याचे आढळले.

'कोविड-19' विषाणूच्या अनुवांशिक रूपांचे निर्धारण ऑगस्ट 2021 पासून नियमितपणे केले जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मते, कोविड विषाणूची अनुवांशिक पूर्वस्थिती एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमध्ये फरक करण्यासाठी वापरली जाऊ शकते. ज्यामुळे या विषाणू संदर्भात उपचाराची नेमकी दिशा ठरवणे सोपे जाते. (हेही वाचा: आनंदवार्ता! महाराष्ट्रात आज एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती)

237 नमुन्यांपैकी 25 नमुने 0 ते 18 वयोगटातील आहेत. त्यापैकी 4 नमुने 0 ते 5 वयोगटातील आहेत, 9 नमुने 6 ते 12 वयोगटातील आहेत आणि 12 नमुने हे 13 ते 18 वयोगटातील होते. हे सर्व नमुने ओमायक्रॉन या कोविड विषाणूच्या उपप्रकाराने संक्रमित असल्याचे आढळून आले. बीएमसीने प्रत्येकाला आपापल्या स्तरावर 'कोविड-19' विषाणू प्रतिबंधक मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये मास्कचा योग्य वापर, दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखणे, गर्दी टाळणे, साबणाने नियमित आणि योग्य प्रकारे हात धुण्याचे आवाहन केले आहे.