Mumbai News: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उकाडा जाणवत आहे. पण, हा उकाडा हैराण करण्याआधीच मुंबईकर दुसऱ्याच गोष्टीने हैराण होण्याची शक्यता आहे. कारण, येत्या काही दिवसांमध्ये मुंबईत वीजेचे दर वाढणार आहेत. नुकतीच वीजबिल वाढीसाठीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. त्यामुळे आता मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. (हेही वाचा: Maharashtra Electricity Price hike: सरत्या वर्षात संकेत, नव्या वर्षात शॉक; महाराष्ट्रात वीज दरवाढ; महावितरणला वसूलीस परवानगी)
मिळालेल्या माहितीनुसार, होणाऱ्या वीज दरवाढीमुळे सध्याच्या घडीला वीजेचे दर 24 टक्क्यांनी महागणार आहेत. महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनच्यावतीने टाटा पॉवरच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यामुळे आता वीजेच्या दरात वाढ होणार आहे. 2024-25 या वर्षासाठी ही वाढ लागू असून, 1 एप्रिल 2024 पासून नव्या दरांनुसार वीजेची बिल लागू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (हेही वाचा:Electricity Price Hike in Mumbai: मुंबईकरांना महागाईचा झटका; विजेच्या दरात 5 -10 टक्के वाढ; जाणून घ्या नवीन दर)
विशेष म्हणजे, ज्या ग्राहकांकडून 100 युनिटहून कमी वीजेचा वापर केला जातो त्यांच्यावर या दरवाढीचा अधिक परिणाम होताना दिसणार आहे. कारण, इथून पुढे त्यांना 1.65 रुपये प्रति युनिट (kWh)ऐवजी थेट 4.96 रुपये प्रति युनिट इतकी रक्कम मोजावी लागणार आहे. या दरवाढीदरम्यानही 500 युनिट किंवा त्याहून अधिक वीजेचा वापर करणाऱ्यांना मात्र दिलासा मिळणार आहे. कारण, या ग्राहकांसाठी वीजेचे दर प्रति युनिट 8.35 रुपयांवरून 7.94 रुपयांवर आले आहेत.
सध्याच्या घडीला टाटा समुदारडून 927 कोटी रुपयांची एरियर रक्कम भरून काढण्यासाठी म्हणून हे दरवाढीचे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रत्यक्षात टाटा समुहाने 12 टक्के वीज दरवाढीची मागणी केली होती. पण, नियामक मंडळानं थेट 24 टक्के वाढीलाच मान्यता दिली ज्यामुळे आता वीजबिलाची गणितं बऱ्याच अंशी बदलताना दिसणार आहेत.