Maharashtra Electricity Price hike: सरत्या वर्षात संकेत, नव्या वर्षात शॉक; महाराष्ट्रात वीज दरवाढ; महावितरणला वसूलीस परवानगी
Electricity Bill (Photo credit: archived, edited, representative image)

Electricity Price Hike 2024: सरत्या वर्षात तुम्हाला वाढत्या वीजदरवाढीचा शॉक बसू शकतो. होय, महावितरणला विद्युत नियामक आयोगाने अतिरिक्त उत्पादन खर्चाचे तब्बल 375 कोटी ग्राहकांकडून वसूली करण्यास परवानगी दिली आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील वीजेचे दर वाढून ग्राहकांना वाढीव विजबीले (Electricity Price Hike) येऊ शकतात. प्राप्त माहितीनुसार, वाढत्या विजदरानुसार ग्राहकांना प्रति युनीट 10 ते 70 रुपये अधिक मोजावे लागतील. ही वसूली इंधन संयोजन शुल्काच्या नावाखाली केली जाणार आहे. अर्थात, अद्यापही या संभाव्य दरवाढीबद्दल अधिकृत माहिती पुढे आली नाही. मात्र, विद्युत नियमाकाने दिलेली मंजूरी विचारात घेता महावितरण दरवाढीसंबंधी नव्या वर्षात निर्णय घेऊ शकते.

इंधन संयोजनाच्या नावाखाली दरवाढ?

विद्युत नियामक आयोगाने दिलेल्या परवानगी नंतर अतिरिक्त उत्पादन खर्चाच्या नावाखाली महावितरण ग्राहकांकडून 385.99 कोटी रुपये वसूल करु शकते. त्यासाठी ग्राहकांना श्रेणीनिहाय प्रति युनीट 10 पैसे ते 70 पैसे इतके अधिकचे आकारले जाऊ शकतात. हे पैसे इंधन संयोजनाच्या नावाखाली आकारले जाऊ शकतात. प्राप्त माहितीनुसार, ग्राहकांना ही वाढीव रक्कम विजबिलाच्या माध्यमातून पुढचे जवळपास 10 महिने द्यावी लागणार आहे. (हेही वाचा, Verification Compulsory For These Aadhaar: 18 वर्षांवरील नव्याने आधारकार्ड काढणार्‍याचं आता प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन होणार!)

पंचवार्षिक योजनेद्वारे वीजदर आगोदरच निश्चित

दरम्यान, महावितरणद्वारा पंचवार्षिक योजना आखण्यात आली असून त्यानुसार ग्राहकांसाठी पाच वर्षांचे वीजदर आगोदरच निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, त्याशिवाय होणारा अतिरिक्त खर्च हा संयोजन दर नावाने गणला जातो. महत्त्वाचे म्हणजे या वेळेला ही दरवाढ केवळ नियमीत ग्राहकच नव्हे तर बीपीएल व कृषी ग्राहकांना देखील सोसावी लागणार आहे.

श्रेणी नुसार युनिट दर

  • बीपीएल ग्राहकांसाठी- प्रति युनिट 10 पैसे
  • 1 ते 100 युनिट वापर असलेल्या ग्राहकांसाठी- प्रति युनिट 25 पैसे
  • 100 ते 300 युनिट वापर असलेल्या ग्राहकांसाठी- प्रति युनिट 45 पैसे
  • 300 हून जास्त युनिट वापर असलेल्या ग्राहकांसाठी- प्रति युनिट 65 पैसे

सरत्या वर्षात महावितरणकढून केवळ संकेत

दरम्यान, वरील सर्व वाढीव पैसे हे इंधन समायोजन शुल्काच्या नावाखाली भरावे लागणार आहेत. अर्थात याबाबत अद्यापपर्यंत कोणताही अधिकृत स्पष्टता होऊ शकली नाही. मात्र, सांगितले जात आहे की, सरत्या वर्षात महावितरणकढून केवळ संकेत देण्यात आले आहेत. नव्या वर्षात ग्राहकांना विजदरवाढीचा थेट शॉक बसू शकतो.

महावितरण ही महाराष्ट्र सरकारची विद्युत वितरण करणारी कंपनी आहे. जिला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित किंवा महावितरण म्हणून ओळखले जाते. तिचे इंग्रजीमधील नाव Maharashtra State Electricity Distribution Company Limited असे आहे. महाराष्ट्रामध्ये ती महावितरण किंवा MSEDCL नावाने प्रचलित आहे. महाराष्ट्र सरकारची ही केवळ एकच कंपनी नाही. विद्युत कायदा 2003 अन्वये राज्य विद्युत मंडळाची पुनर्रचना झाली आणि त्यातून महावितरण, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) अशा तीन कंपन्या अस्तित्वात आल्या. या तिन्ही कंपन्यांची घोषणा 6 जून 2005 रोजी करण्यात आली.