Electricity | Representational Image (Photo Credits: Pixabay)

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील (Mumbai) जनतेला काल महागाईचा मोठा झटका बसला. शहरातील विजेचे दर (Mumbai: Power Tariff) वाढले आहेत. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्णयानंतर मुंबईतील घरगुती विजेचे दर 5-10 टक्क्यांनी वाढले आहेत. नियामकाने 2023-24 आणि 2024-25 च्या नवीन दरांना मान्यता दिली आहे. अशा प्रकारे 2025 पर्यंत एकूण विजेचे दर सुमारे 21 टक्क्यांनी वाढणार आहेत. हे दर 1 एप्रिलपासून लागू झाले आहेत.

मुंबईतील वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये बेस्ट, टाटा पॉवर आणि महावितरणचे दर महागले असून, अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. नव्या दरांनंतर महावितरणची वीज सर्वात महाग झाली आहे.

वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे म्हणाले की, महाराष्ट्र वीज आयोगाच्या निर्णयानुसार महावितरणला येत्या दोन वर्षांत 39,567 कोटी रुपये मिळणार आहेत. याचा अर्थ वसूल करावयाची रक्कम म्हणजेच वाढीव दर 21.65 टक्के आहे. पहिल्या वर्षी सरासरी पेआउट दर 7.25 टक्के आणि दुसऱ्या वर्षीच्या वाढीसह एकूण 14.75 टक्के आहे.

होगाडे पुढे म्हणाले की, थेट विजेचे दर 10 ते 52 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. वीज आयोगाचा आदेश सर्वसामान्यांवर भार टाकणारा आणि डोळ्यात धूळफेक करणारा आहे. ही वाढ बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, या आदेशाविरुद्ध विद्युत अपील प्राधिकरण, नवी दिल्ली येथे अपील दाखल केले जाईल. दरम्यान, वीज कंपन्यांनी वीज दरवाढीचा प्रस्ताव फार पूर्वीच ठेवला होता. इंधन समायोजन शुल्काचा वाढलेला बोजा आणि कोरोनाच्या काळात झालेला तोटा भरून काढण्यासाठी वीज कंपन्यांना त्यांच्या वीज दरात वाढ करण्याची गरज असल्याचे त्यामागील कारण सांगण्यात आले. (हेही वाचा: मार्चमध्ये GST महसूलात 13 टक्क्यांनी वाढ, संकलन ₹1.4 लाख कोटींहून अधिक)

महावितरणच्या ग्राहकांना 2023-24 आणि 2024-35 या वर्षात विजेसाठी 6 टक्के जास्त पैसे द्यावे लागतील. तर बेस्टच्या ग्राहकांसाठी, 2023-24 मध्ये 6.19 टक्के आणि 2024-25 मध्ये 6.7 टक्के वीज दरात वाढ होऊ शकते. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या निवासी ग्राहकांसाठी, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 5 टक्के आणि आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 2 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. टाटा पॉवरच्या ग्राहकांसाठी, सन 2023-24 मध्ये 10 टक्के आणि 2024-25 मध्ये 21 टक्के वाढ दिसू शकते. ही कंपनी 0-100 युनिटपर्यंतच्या बिलांसाठी सर्वात स्वस्त दरात वीज पुरवते.