Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रात पुन्हा एकदा सक्रीय झालेल्या मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. पुढील दोन दिवसांत राज्यभर चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उद्या बुधवार, 15 जुलै रोजी मुंबई (Mumbai) सह ठाणे (Thane), पालघर (Palghar), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg) या जिह्यांच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 14 आणि 15 जुलै रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या भागांसाठी ऑरेंज (Orange) आणि येल्लो (Yellow) अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचे मुंबई हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी व्हिडिओ ट्विट करत येत्या 24/48 तासांतील हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.
K S Hosalikar Tweet:
महाराष्ट्राचे हवामान व इशारे; येत्या 24/48 तासा साठी
प्रादेशीक हवामान केंद्र, मुंबई pic.twitter.com/arsmkmpAas
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 14, 2020
मुंबईत मागील 24 तासांत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तर गेल्या 3 तासांत मध्यम संथ स्वरुपाचा पाऊस मुंबईकरांनी अनुभवला. दरम्यान पुढच्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी चांगल्या पावसा ची शक्यता असून मध्य महाराष्ट्र घाट भागात, कोकण, गोवा मध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.