Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रामध्ये आज (14 जुलै) पासून पुन्हा दमदार पाऊस बरसण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता 14-16 जुलै याकाळात महाराष्ट्रात उत्तर कोकण आणि गोवा या भागात पावसाचा जोर वाढून मुसळधार सरी बरसू शकतात. मागील काही दिवसांपासून दक्षिण कोकणामध्ये धुव्वाधार पाऊस बरसत आहे. मुंबई मध्ये मात्र अधून मधून पावसाची मोठी सर बरसून जाते. सध्या पश्चिम कोकण किनारपट्टीवर वार्‍याचा वेग वाढला असून परिणामी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने त्यांच्या अंदाजपत्रकामध्ये स्पष्ट केला आहे.

मुंबईत जुलै महिन्यात 840.7mm इतका पाऊस पडणे अपेक्षित आहे. आत्तापर्यंत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुमारे 506.4 mm इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. हा पाऊस जुलै महिन्यातील 60% पावसाइतका आहे.

ANI Tweet

कोकणामध्ये, गोव्यामध्ये सध्या भाताची शेती सुरू आहे. दमदार पाऊस हा भातशेतीसाठी पुरक असल्याने आता पश्चिम किनारपट्टीवरील शेतकर्‍यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान मागील 1-2 दिवसांमध्ये सातत्याने पावसाला जोर असल्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळणं, रस्ते वाहून जाणं अशा घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याच्या घटनादेखील समोर आल्या आहेत. कोकणामध्ये काही गावांमध्ये जोरदार पावसामुळे पूर सदृष्य स्थिती निर्माण झाल्याचं चित्र देखील पहायला मिळालं.