महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहेत. मात्र लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. तर कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी उपचार करत आहेत. परंतु नॉन कोविड रुग्णांसाठी दवाखाने किंवा नर्सिंग होम सुरु ठेवण्याची सुचना वारंवार देण्यात येत आहे. तरीही ते बंद ठेवण्यात येत असल्याने संबंधित दवाखाने आणि नर्सिंग होमच्या विरोधात कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करावेत असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्याचसोबत जर चाळीतील किंवा सोसायटी परिसरातील नागरिकांनी दवाखाने सुरु करण्यास विरोध केल्यास त्यांच्या विरोधात साथरोग कायदा 1897 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे संकेत सुद्धा महापालिकेने दिले आहेत.
महापालिकेच्या सर्व विभागातील वैद्यकिय अधिकारी प्रत्येक वॉर्डातील दवाखाने किंवा नर्सिंग होमचे सर्वेक्षण करणार आहेत. त्यानुसार जे दवाखाने किंवा नर्सिंग होम बंद दिसून येतील त्यांच्या विरोधात कारवाई करत परवाने रद्द करण्यात येणार आहेत. त्याचसोबत खासगी दवाखान्यांसाठी सुद्धा हा नियम लागू असणार आहे. तर दवाखान्यात येणाऱ्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान स्पर्श न करता तपासावे असे सांगण्यात आले आहे. तसेच एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याला महापालिकेच्या क्वारंटाइन केंद्रावर पाठवावे. खासगी दवाखांन्यामध्ये नॉन कोविड रुग्णांवर उपचार सुरु ठेवण्यात यावेत असे ही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र डॉक्टरांनी किंवा वैद्यकिय कर्मचाऱ्यांनी रुग्णांना तपासताना कोरोनाच्या संबंधित सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.(Coronavirus: अत्यावश्यक सेवेचा गैरवापर करुन मुंबईतून सांगलीत आणलेल्या तरुणीची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह)
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता आयसोलेश वॉर्डची सोय राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. तर आता महापालिकांच्या शाळा सुद्धा क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. तसेच आत प्लाझ्मा थेरपीचा वापर करुन कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.