Mumbai Local Train Mega Block: रविवारी मुंबईच्या पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगा ब्लॉक; लोकल ट्रेन सेवेवर होणार परिणाम, जाणून घ्या सविस्तर
Mumbai Local | (Photo Credit - Twitter)

Mumbai Local Train Mega Block: मुंबईमध्ये (Mumbai) तुम्ही या रविवारी रेल्वेने प्रवास करण्याची योजना आखत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. रविवारी रेल्वेच्या पश्चिम, सेंट्रलची मेन लाईन आणि हार्बर या तिन्ही उपनगरीय कॉरिडॉरवर मेंटेनन्स ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहेत. ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी, सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान, 12 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर पाच तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येईल. रेल्वे अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.

या कालावधीत सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान सर्व धिम्या गाड्या जलद मार्गावर चालवल्या जातील. या गाड्या विलेपार्ले आणि राम मंदिर स्टेशनवर थांबणार नाहीत. हार्बर लाईनवरील गाड्या या स्थानकांवर थांबतील. दुसरीकडे, मध्य रेल्वेवर माटुंगा आणि मुलुंड अप आणि डाऊन फास्ट लाईन दरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 3.10 पर्यंत मेगाब्लॉक घेईल. सकाळी 10.25 ते दुपारी 2.45 पर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद सेवा माटुंगा येथे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. (हेही वाचा: Night Power Block: शनिवारी रात्री भायखळा ते सीएसएमटी आणि वडाळा रोड ते सीएसएमटी लोकल सेवा राहणार बंद)

त्याचप्रमाणे सकाळी 10.50 ते दुपारी 3.08 पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप फास्ट सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. दोन्ही दिशेने गाड्या नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा धावतील. या दिवशी हार्बर मार्गावरही ब्लॉक घेण्यात येणार आहे. कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत कोणतीही सेवा धावणार नाही. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांवर विशेष गाड्या चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना 12 मे रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी आहे.