Mumbai Local Train | Photo Credit- X

मुंबई शहरामध्ये लोकल ट्रेन ही शहराची नस मानली जाते. दररोज लाखो नागरिक या सेवेचा लाभ घेतात आणि प्रवास करतात. असे असले तरी मुंबई लोकल अपघात आणि मृत्यू (Mumbai Local Train Deaths) हा एक वेगळा चिंतेचा विषय आहे. सन 2014 ते 2024 या 11 वर्षांच्या कालावधीत मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावर 29,000 पेक्षा अधिक लोकांनी आपले प्राण गमावले (Mumbai Railway Track Accidents), असे धक्कादायक वास्तव माहिती अधिकार (RTI) अंतर्गत समोर आले आहे. या एकूण 29,048 मृत्यूंपैकी 8,416 मृतदेहांची ओळख अजूनही पटलेली नाही, असे शासकीय रेल्वे पोलीस (GRP) विभागाने स्पष्ट केले आहे.

रेल्वे रुळ ओलांडता अधिक अपघात

माहिती अधिकार (RTI) अंतर्गत समोर आलेले वास्तव मुंबईतील अतिभारग्रस्त उपनगरी रेल्वे प्रणालीच्या धोकादायक स्वरूपावर प्रकाश टाकते. दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या या प्रणालीचा मानवी किंमतीचा आराखडा या आकडेवारीतून समोर आला आहे. GRP ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई लोकल अपघातामध्ये होणाऱ्या या मृत्यूंच्या प्रमुख कारणांमध्ये बेकायदेशीर रेल्वे रुळ ओलांडल्याने होणाऱ्या अपघाताचे प्रमाण अधिक आहे. तब्बल 15,000 हून अधिक जणांनी रुळ ओलांडताना जीव गमावला, तर सुमारे 6,500 प्रवासी अतिगर्दीच्या धावत्या लोकलमधून पडून मृत्युमुखी पडले. (हेही वाचा, Mumbai Local Ladies Coach Fight Video: मुंबई लोकल मध्ये महिलांच्या डब्ब्यात झिंज्या उपटत तुंबळ मारहाणीचा व्हिडिओ वायरल; रेल्वे प्रशासनाकडू तपास सुरू)

मृतदेहांची ओळख पटत नाही

GRP च्या एका अधिकाऱ्याने सांगितले, रेल्वे रुळ ओलांडल्यामुळे होणारे मृत्यू हे अजूनही सर्वाधिक आहेत. रेल्वे अपघात होताना धडक बसल्यावर शरीर इतके विद्रूप होते की ओळख पटवणे फार कठीण होते. आम्ही ओळख पटवण्यासाठी ID कार्ड, मोबाईल, गोंदवलेले नाव, दागिने किंवा कपड्यांवरील टेलरचा टॅग यांचा आधार घेतो. रेल्वे परिसरात मृतदेह सापडल्यास GRP हे संपूर्ण कामकाज पार पाडते. त्यात मृतदेह उचलणे, फोटो घेणे, शवपेटीची व्यवस्था करणे, शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेणे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अंत्यविधी करणे, यांचा समावेश होतो. (हेही वाचा, Railway Accidents: गेल्या 8 महिन्यांत देशात 29 रेल्वे अपघात; 17 जणांचा मृत्यू, 71 जण जखमी, कारणांमध्ये उपकरणे बिघाड, तोडफोड यांचा समावेश)

रुग्णालयाची NOC मिळवून कायदेशीर अंत्यसंस्कार

ओळख न पटलेले मृतदेह किमान काही आठवडे ते तीन महिने पर्यंत शवगृहात ठेवले जातात. या काळात GRP सर्व पोलीस ठाण्यांमध्ये मृत व्यक्तीचे फोटो व माहिती पाठवते आणि मिसिंग रिपोर्ट्सशी तुलना करते. DNA नमुने सुरक्षित ठेवले जातात आणि सर्व वैयक्तिक वस्तू नोंदवल्या जातात. नातेवाईक पुढे न आल्यास रुग्णालयाची NOC मिळवून कायदेशीर पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात.

अशा दु:खद आकडेवारी असूनही, अलीकडच्या वर्षांत मृत्यूदरात थोडीशी घट झाली आहे, असे GRP अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वे प्रशासनाने उचललेल्या काही उपाययोजनांमुळे ही घट झाली आहे – जसे की नवीन फूटओव्हर ब्रिज बांधणे, लिफ्ट आणि एस्कलेटर बसवणे, जनजागृती मोहिमा आणि लोकलची संख्या वाढवणे. पण हे पुरेसे नाही, असेही हे अधिकारी सांगतात.

GRP अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले, अतिगर्दीमुळे प्रवाशांना धोकादायक प्रवास करावा लागतो. रेल्वे रुळांचे संपूर्ण कुंपण आणि सर्व लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद होणारी प्रणाली लागू केल्याशिवाय 'झिरो डेथ' हे फक्त स्वप्नच राहील.

दरम्यान, ही RTI माहिती डॉ. सरोश मेहता यांनी मागवलेली असून, मुंबई लोकलच्या धावत्या यंत्रणेमध्ये तातडीने संरचनात्मक आणि सामाजिक बदल करण्याची गरज असल्याचे तीव्रपणे अधोरेखित करते. दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या या नेटवर्कमध्ये दरवर्षी शेकडो लोक मृत्युमुखी पडतात, हे वास्तव या अहवालातून समोर आले आहे.