हेल्पएज इंडियाने (HelpAge India) वृद्धांबाबत केलेला एक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, मुंबईतील (Mumbai) 42% वृद्धांचे म्हणणे आहे की त्यांचे उत्पन्न जगण्यासाठी अपुरे आहे. आपल्या वृद्धापकाळासाठी आर्थिक नियोजन आणि सामाजिक सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हेल्पएज इंडियाने मंगळवारी, युनायटेड नेशन्स (UN) मान्यताप्राप्त ‘जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिना’च्या पूर्वसंध्येला ‘ब्रिज द गॅप: अंडरस्टँडिंग एल्डर नीड्स’ हा राष्ट्रीय अहवाल प्रसिद्ध केला.
अहवालात म्हटले आहे की राष्ट्रीय स्तरावर 71% वृद्ध काम करत नाहीत, तर 36% वृद्ध काम करण्यास इच्छुक आहेत आणि त्यापैकी 40% 'शक्य असेल तोपर्यंत' काम करू इच्छितात. मुंबईत, अभ्यासात असे आढळून आले आहे की मुंबईतील 26% वृद्ध निवृत्तीनंतरही काम करण्यास इच्छुक आहेत. मुंबईत, 72% वृद्ध आपल्या गरजांसाठी कुटुंबावर अवलंबून आहेत, तर 16% पेन्शन आणि रोख हस्तांतरणावर अवलंबून आहेत. 58% वृद्धांचे म्हणणे आहे की, त्यांचे उत्पन्न पुरेसे आहे, तर 42% लोक म्हणतात की त्यांचे उत्पन्न जगण्यासाठी अपुरे आहे.
भारतात अंदाजे 138 दशलक्ष वृद्ध आहेत, जे लोकसंख्येच्या 10 टक्के आहेत. कोविड-19 चा प्रभाव वृद्धांवरही झाला. या महामारीनंतर आधी वृद्धांना ज्या चौकटीतून बघितले जात होते, ती चौकात बदलण्यासाठी जगभरातील सरकारे, संस्था आणि समाजाला भाग पाडले गेले. वृद्धांना साथीच्या आजारादरम्यान सर्वात असुरक्षित आणि सर्वात जास्त फटका बसलेला वर्ग म्हणून ओळखले गेले.
हा अहवाल भारतातील 22 शहरांमधील 4,399 वृद्ध आणि 2,200 तरुण प्रौढ काळजीवाहकांच्या उत्तरांवर आधारित आहे. यामधील 79% वृद्धांना असे वाटते की त्यांचे कुटुंब त्यांच्यासोबत पुरेसा वेळ घालवत नाही. बहुसंख्य (82%) वृद्ध त्यांच्या कुटुंबासोबत राहत असले तरी, 59% वृद्धांना वाटते की त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्यासोबत अधिक वेळ घालवायला पाहिजे. यावरून असे दिसून येते की कुटुंबासोबत राहिल्यानंतरही अनेक वृद्धांना एकटेपणा जाणवतो. (हेही वाचा: मुंबईला पाण्यापासून धोका, शहर दरवर्षी 2 मिमी वेगाने बुडत असल्याचा दावा)
राष्ट्रीय स्तरावर, लक्षणीय 67% वृद्धांनी नोंदवले की, त्यांच्या जीवनातील या गंभीर टप्प्यावर त्यांच्याकडे कोणताही आरोग्य विमा नाही आणि केवळ 13% सरकारी विमा योजनांतर्गत संरक्षित आहेत. कोविड नंतर चांगल्या आरोग्य संरक्षणाची गरज प्रकर्षाने जाणवली असून, 49% वृद्धांनी चांगले आरोग्य विमा आणि चांगल्या आरोग्य सुविधांची आशा व्यक्त केली आहे. 42% लोकांनी घरातून अधिक चांगला सपोर्ट मिळायला हवा असे सांगितले.