मुंबईतील लहान मुलांच्या उपाचारासाठी शासनाचे वाडिया रुग्णालय प्रसिद्ध आहे. मात्र राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून येणारा निधी रखडला गेल्याने वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या वाटेवर चालले आहे. तर रुग्णालयातील औषधांचा साठ संपल्याने नव्या रुग्णांना येथे दाखल करुन घेण्यास डॉक्टर नकार देत आहे. आतापर्यंत 300 पेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे निधी नसल्याने रुग्णांवर औषधोपचार होणे मुश्किल होऊन बसले आहे.
रुग्णालयाचा जवळजवळ 200 कोटीहून अधिक निधी राज्य सरकार आणि महापालिकेकडे रखडला गेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पालिकेकडून रुग्णालयासाठी 13 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. मात्र हा निधी पुरेसा नसल्याने पुढील कामे करणे अवघड झाले आहे. निधी अभावी शस्रक्रिया आणि बाह्यरुग्ण विभाग बंद करण्यात येत आहेत. यामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. तर रुग्णालयातील कर्मचारी सोमवारी आंदोलन करणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.(केईएम रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या बालकाला शॉर्टसर्किटचा धक्का लागल्याने कापला हात)
महापालिकेने या प्रकरणी रुग्णालयाचा अडकलेल्या निधीपैखी 50 टक्के येत्या दोन-तीन दिवसात देण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. तर वाडिया रुग्णालयात आजवर अनेक मोठ्या शस्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. तसेच 35 पेक्षा अधिक उत्तम सुविधा येथील रुग्णालयात दिल्या जातात. मात्र आता निधी अभावी रुग्णालय खरंच बंद होणार का याची चिंता व्यक्त केली जात आहे.