केईएम रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या बालकाला शॉर्टसर्किटचा धक्का लागल्याने कापला हात
KEM Hospital (Photo Credits-Facebook)

केईएम रुग्णालयात (KEM Hospital) उपचारासाठी आलेल्या बालकाला शॉर्टसर्किटचा धक्का लागल्याने त्याचा हात कापल्याचा भयंकर धक्कादायक प्रकार घडला आहे. तसेच बालकाचा चेहरा सुद्धा एका बाजूने भाजला गेला आहे. या सर्व प्रकारामुळे बालकाच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाच्या या भोंगळ कारभाराच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. तर या प्रकरणी रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या विरोधात भोईवाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रिन्स असे पीडित बालकाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. प्रिन्स याला त्याच्या छातीत छिद्र असल्याने मुंबईत येत केईएम रुग्णालयात उपचारासाठी त्याला आणण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांकडून प्रिन्स याची तपासणी केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी अॅडमिट करुन घेण्यात आले. तर बुधवारी रात्री प्रिन्स याच्या बेडच्या बाजूला असलेला ऑक्सिजन आणि वायरिंग मध्ये काही कारणामुळे शॉर्टसर्किट होत आग लागली. त्यावेळी बेडवर झोपलेल्या प्रिन्सचा हात आणि एका बाजूचा चेहरा भाजला गेला.(मुंबई: धक्कदायक! चॉकलेटचे आमिष दाखवून 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात)

या प्रकरणी प्रिन्सच्या हाताला गंभीर इजा झाल्याने रुग्णालयाच्या प्रशासनाने त्याचा हात दंडापासून कापला. आपल्या मुलाचा हात कापल्यानंतर संतापलेल्या प्रिन्सच्या वडिलांनी पोलीस स्थानकात धाव घेत रुग्णलायाच्या कारभाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तर उपचारामुळे आपला मुलगा बरा होईल या आशेने आलेले विवाहित दांपत्यांना त्यांच्या मुलाचा हात कापल्याने फार दु:खी झाले आहेत. तसेच या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.