Image of Bandra Worli Sea Link in Mumbai (Image Credit: Facebook/BWSL.Mumbai)

आरएमएसआय (RMSI) या जागतिक जोखीम व्यवस्थापन संस्थेच्या अलीकडील विश्लेषणात एक मोठी माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, मुंबईतील (Mumbai) हाजी अली दर्गा, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, वांद्रे-वरळी सी-लिंक, मरीन ड्राइव्हवरील क्वीन्स नेकलेस यासह इतर अनेक मालमत्ता आणि रस्त्यांचे जाळे 2050 पर्यंत पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. हिंदुस्तान टाईम्समधील एका अहवालानुसार, समुद्राच्या पातळीत वाढ होण्याचा भारतीय शहरांवर होणाऱ्या परिणामाबाबत अभ्यास करणाऱ्या विश्लेषणात असे दिसून आले आहे.

यामध्ये पुढे म्हटले आहे की, मुंबई व्यतिरिक्त कोची, मंगलोर, चेन्नई, विशाखापट्टणम आणि तिरुअनंतपुरम देखील पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. विश्लेषणानुसार, मुंबईत 2050 पर्यंत सुमारे 998 इमारती आणि 24 किमी लांबीचा रस्ता संभाव्य समुद्र पातळी वाढीमुळे प्रभावित होईल. शिवाय, आर्थिक राजधानीत भरती-ओहोटीच्या वेळी संभाव्य समुद्र पातळी वाढल्याने सुमारे 2,490 इमारती आणि 126 किमी लांबीचा रस्ता प्रभावित होईल. त्याचप्रमाणे, चेन्नईमध्ये, 5 किमी लांबीचा रस्ता आणि 55 इमारतींना धोका आहे, तर कोचीमध्ये, 2050 पर्यंत सुमारे 464 इमारती बाधित होण्याची शक्यता आहे.

याआधी IPCC च्या हवामान बदल अहवालात म्हटले होते की, ग्लोबल वॉर्मिंग धोकादायकपणे नियंत्रणाबाहेर जाण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळे भारतासह जगभरात समुद्राची पातळी वाढू शकते. एका अहवालाचे विश्लेषण केल्यानंतर, नासाने म्हटले होते की, 2100 पर्यंत भारतातील 12 शहरे अर्धा फुटापासून ते साडेतीन फुटांपर्यंत समुद्राच्या पाण्याने व्यापली जातील. (हेही वाचा: नाशिक त्र्यंबकेश्वर येथील मेटघर गावातील पाणी प्रश्न बिकट)

आयपीसीसीच्या या अहवालात संशोधकांनी म्हटले आहे की, 1850 नंतरच्या चार दशकांत जेवढी उष्णता वाढली नाही तेवढी गेल्या 40 वर्षांत वेगाने वाढली आहे. त्याचबरोबर प्रदूषणाला आळा घातला नाही, तर कडक उष्मा, वाढते तापमान आणि अनियंत्रित हवामानाचा सामना करावा लागेल, असा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे.