Mumbai Goa Highway Traffic Updates: कोकणातील मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प; वाहतूककोंडीमुळे चाकरमान्यांचे हाल
Mumbai-Goa Highway Representative Image (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात दमदार पावसाने हजेरी लावली असून मुंबईतही पावसाची कोसळधार सुरुच आहे. तर कोकणात (Konkan) पावसाने धुमाकूळ घातला असून गणपती साठी गावाला जाणा-या चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) काही ठिकाणची वाहतूक थांबविण्यात आली आहे. मटाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाल्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कोकणात पावसाची संततधार सुरुच असून मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटाच्या पायथ्याला असलेला बावनदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. महामार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

गेल्या 2-3 दिवसांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्गात धो-धो पाऊस कोसळत असून अनेक गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावातील मुख्य नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गावक-यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. Maharashtra Monsoon Update: येत्या 24 तासांत कोकण, मराठवाड्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता- IMD

सततच्या पावसामुळे कोकणातील वीजपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. सर्वात मोठा फटका मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला बसला आहे. येथील काही ठिकाणची वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे गावाकडे निघालेले अनेक चाकरमानी अडकून पडले आहेत.

जापूर तालुक्यातील कोदवली, संगमेश्वरमधील बावनदी, लांजा तालुक्यातील काजळी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. येत्या 24 तासांत कोकण (Konkan), मराठवाड्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबईत काल सकाळपासूनच पावसाने चांगला जोर धरला असून आजही हा जोर कायम आहे. लोकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये आणि स्वत: ची काळजी घ्यावी असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.