डोंबिवली: पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा पूल 27 मे पासून बंद, डोंबिवलीकरांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागणार
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

डोंबिवली (Dombivali) येथील पूर्व-पश्चिम दिशेला असणारा पूल हा धोकादायक असल्याचे एका ऑडिटमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे या पूलावरील वाहतूक येत्या 27 मे पासून बंद करण्यात येणार असल्याने डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

आयआयटीच्या स्ट्रक्चरल ऑडिमध्ये डोंबिवलीत असणारा पूर्व-पश्चिम पूल धोक्यात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोपर आणि ठाकुर्ली पुलावरुन होणारी वाहतूक ही डोंबिवलीसाठी दोन्ही मार्गांवरुन सुरु असते. त्यामुळे आता कोपरच्या दिशेने वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ठाकुर्ली पुलावर काही कालावधीसाठी ही वाहतूक या मार्गावरुन वळवण्यात येणार आहे. परंतु ठाकुर्ली पुलाची रुंदी ही निमुळती असल्याने प्रवाशांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.(दूध उत्पादकांना आंदोलन करत दूध रस्त्यावर फेकण्याचा हक्क- मुंबई हायकोर्ट)

मात्र वाहतुक पोलिसांनी या निर्णयावर आक्षेप घेतला असून याबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर डोंबिवलीतील पश्चिमेकडील वाहनांना रेल्वे स्थानकाजवळील महात्मा फुले रस्त्यावरुनच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाने ठाकुर्ली पुलाने डोंबिवली पूर्वेला जाता येणार आहे. तर पूर्वेकडून पश्चिमेकडे येण्यासाठी घरडा सर्कल पासून जाणाऱ्या मार्गाने ठाकुर्ली पूल रस्त्याने प्रवाशांना जाता येणार आहे.