एका व्यक्तीच्या पोटातून 7 आणि 5.8 किलोच्या दोन किडन्या काढण्यात मुंबईतील डॉक्टरांना यश आले आहे. या दोन्ही किडन्यांचे एकूण वजन 12.8 किलो इतके होते. ऑटोसोमल डोमिनंट पॉलिसिस्टिक किडनी डिसीस (Autosomal Dominant Polycystic Kidney Disease) या आजारामुळे या रुग्णाच्या किडन्यांचं वजन आणि आकार वाढल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. साधारणपणे किडनीचं वजन 120-150 ग्रॅम असून 8-10 सेंमी इतकी त्यांची लांबी असते. मात्र या रुग्णाच्या किडन्यांचं वजन तब्बल 7 आणि 5.8 किलो असून त्यांची लांबी 26-21 सेंमी इतकी होती.
रोमन परेरा असं या रुग्णाचं नाव असून ते गोव्याचे रहिवासी आहेत. ऑटोसोमल डोमिनंट पॉलिसिस्टिक किडनी डिसीस या आजारात किडनीभोवती सिस्ट तयार होतात. गेल्या अनेक वर्षांपासून परेरा या आजारासह जगत आहेत. मात्र मागील दीड-दोन वर्षांपासून त्यांना अधिक त्रास व्हायला लागला. श्वास घेताना त्रास होत होता, चालताना अशक्तपणा जाणवत होता. त्यांच्या हिमोग्लोबिनचे प्रमाणही खूप कमी झाले होते. त्यामुळे डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र किडन्यांचा आकार खूप मोठा असल्याने लॅप्रोस्कोपी न करता ओपन सर्जरी करण्यास प्राधान्य दिले गेले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ADPKD हा अत्यंत दुर्मीळ आजार असून हा केवळ 5% लोकांना होतो. (अबब! रुग्णाच्या शरीरातून डॉक्टरांनी काढली तब्बल 7.4 किलोची किडनी)
परेरा यांची पत्नी त्यांना किडनी दान करु इच्छित होती. मात्र रक्तगट न जुळल्याने तसे करता आले नाही. त्यामुळे डॉक्टरांनी स्वॅप किडनी प्रत्यारोपणाचा मार्ग अवलंबण्याचे ठरवले. अमरावतीतील नितीन नावाच्या एका रुग्णालाही किडनीची गजर होती. त्याची पत्नीही काही कारणास्तव त्याला किडनीदान करु शकत नव्हती. अशावेळी नितीनच्या पत्नीने परेरा आणि परेरा यांच्या पत्नीने नितीनला किडनी दान केले. यामुळे दोन्ही रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.