नुकतीच मुंबई पोलिसांनी जाहीर केलेल्या गुन्हेगारीच्या आकडेवारी (Mumbai Crime Report 2019) पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. मुंबई (Mumbai) येथील बलात्काराच्या (Rape Case) घटनेत 14 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे खरेच मुंबईसारख्या शहरात महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबई सारख्या मोठया शहरामध्ये दररोज वेगवेगळया प्रकारचे गुन्हे घडत असतात. मुंबईत गेल्या वर्षात घडलेल्या कोणत्या स्वरुपाचे किती गुन्हे घडले आहे, याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मुंबईत दररोज चोरीचे गुन्हे घडत असतात. पण 2018 च्या तुलनेत गेल्या वर्षी यामध्ये 6 टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच बलात्काराप्रमाणे विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्येही वाढ झाल्याचे समजत आहे.

मुंबईत 2018 साली 41 हजार 901 गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्यानंतर गेल्यावर्षी पोलिसांकडे एकूण 41 हजार 932 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यात 2018 च्या तुलनेत गुन्ह्यांच्या संख्येत 0.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यात अधिक वाढ झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. 2018 मध्ये बलात्काराचे 889 गुन्हे नोंदवण्यात आले होते. परंतु गेल्यावर्षी बलात्काराचे 1 हजार 15 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी गुन्ह्याची उकल करण्याचे प्रमाणही मोठे आहे. 2019 मध्ये 41 हजार 932 गुन्ह्यांपैकी 28 हजार 802 गुन्हयांची उकल केली. 2018 मध्ये 41 हजार 901 पैकी 28 हजार 812 गुन्ह्यांची उकल पोलिसांकडून करण्यात आली होती. गुन्ह्याची उकल करण्याचे प्रमाण 69 टक्के आहे. मध्ये विनयभंगाची 2 हजार 586 प्रकरणे नोंदवण्यात आली होती. 2019 मध्ये 2 हजार 678 विनयभंगाच्या गुन्ह्यांची नोंद झाली. खंडणीचे गुन्हे 228 वरुन 253 दरोडेखोरीचे गुन्हे 931 वरुन 987, हत्येचा प्रयत्न 280 वरुन 343 पर्यंत वाढ झाली. हत्येच्या गुन्ह्याचे प्रमाण सारखेच आहे. कार चोरीच्या 2 हजार 693 घटना घडल्या. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये चोरीच्या गुन्ह्यांमध्ये 6 टक्क्यांनी घट झाली तर, पण बलात्काराचे गुन्हे 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्रात दररोज 30 मुलांचे अपहरण, 72 टक्के मुलींचा समावेश; लहानांवर होणार्‍या गुन्ह्यांच्या बाबतीत राज्याचा तिसरा नंबर

सध्या महिला सर्वच क्षेत्रात पुढे आहेत. त्यांच्या कामाच्या पद्धतींबरोबरच कामाच्या वेळांमध्येही बदल झाला आहे. अनेक महिला रात्रपाळीही करतात. अशावेळी निश्चित ठिकाणी सुरक्षित पोहोचणे गरजेचे आहे. मात्र, मुंबई पोलिसांच्या नव्या आकडेवारी पाहिली तर परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून येत आहे.